श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ मिळतो !
१. श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा (उत्तर आवाहन)
अ. विधी : गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी – १. आचमन, २. संकल्प, ३. चंदनार्पण, ४. अक्षतार्पण, ५. पुष्पार्पण, ६. हरिद्रा (हळद)-कुंकुमार्पण, ७. दूर्वार्पण, ८. धूप-दीप दर्शन अन् ९. नैवेद्य. (पाठभेद : चंदनाच्याच वेळी हळद अन् कुंकू वाहातात.)
यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्यात आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी. (श्री गणपतीच्या पूजेसंबंधीचे सविस्तर विवेचन सनातनचा लघुग्रंथ ‘श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)’ यात केले आहे. तसेच ‘श्री गणेश पूजाविधी’ सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. http://www.sanatan.org/mr/a/733.html)
२. विसर्जन
उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीसमवेत दही, पोहे, नारळ, मोदक इत्यादी शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.
अ. उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होणे सर्वथैव इष्ट असणे : ‘श्री गणेशविसर्जनाविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही. याचाच अर्थ गणेशविसर्जन केव्हाही केले, तरी श्री गणेशमूर्तीतील देवत्व दुसरे दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून कोणत्याही देवाची उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे. सोयर वा सुतक असले तरी पुरोहितांकडून श्री गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसुतीची इत्यादी वाट न पहाता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे, हे शास्त्राला धरून आहे.’
आ. मूर्तीत आलेल्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाणे : ‘मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही’, असे म्हटले आहे. असे असतांना गणेशोत्सवात एक दिवसापेक्षा जास्त काळ पुजल्या जाणार्या गणेशमूर्तींच्या उपासनेचा लाभ भाविकांना कसा मिळेल, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. याचे उत्तर असे आहे – मूर्तीतील देवत्व नष्ट झाले, तरी त्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीत २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची पूजा होत असल्याने पूजकाच्या भक्तीभावाप्रमाणे मूर्तीतील चैतन्यात वाढही होऊ शकते. २१ दिवसांनंतर मूर्तीतील चैतन्य हळूहळू घटू लागते.
इ. मूर्ती आणि पूजेतील निर्माल्य यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागील शास्त्र : वहात्या पाण्यासमवेत मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याकारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास साहाय्य होते.
पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित करावे. पाने-फुले असे नैसर्गिक घटक असलेल्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट रासायनिक घटक असलेल्या गोष्टींमुळे जलप्रदूषण होते.
इ १. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात का करू नये ? : ‘प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जना’च्या नावाखाली काही महापालिका, स्थानिक प्रशासन, धर्मद्रोही संघटना, स्वयंसेवी संस्था आदींकडून ठिकठिकाणी तात्पुरते पाण्याचे हौद बांधले जातात. अशा हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे; कारण प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे शास्त्र आहे. वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे मूर्तीतील चैतन्य पाण्यातून सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा लाभ मिळतो. हौदातील पाणी वहाते नसल्यामुळे या आध्यात्मिक लाभापासून भाविक वंचित होतात. हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर संबंधित कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती महापालिकेच्या कचर्याच्या गाडीतून नेल्या जातात.
ई. निर्माल्य असे विसर्जित करा !
एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो; परंतु आपत्काळात निर्माल्य विसर्जित करता येईल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने किंवा पाणी शुद्ध नसल्याने निर्माल्य पाण्यात विसर्जित करता येत नाही. अशा वेळी वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा, यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत-निर्मितीसाठी करावा. निर्माल्य खत-निर्मितीसाठी वापरणे शक्य नसल्यास देवाला प्रार्थना करून ते टाकून द्यावे.
– श्री. दामोदर विष्णु वझेगुरुजी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)