पुणे महापालिकेच्या वतीने घरच्या घरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर देण्याचा धर्मद्रोही निर्णय !

अमोनियम बायकार्बोनेट सारखे रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हा श्री गणेशाचा अवमान आहे. आपल्या देवतांची भक्तीभावाने पूजलेली मूर्ती आपण केमिकलच्या पाण्यामध्ये टाकणार का ? कि धर्मशास्त्रानुसार पाण्यात विसर्जित करणार ? याचा भक्तांनी विचार करावा ! – संपादक 

पुणे, १८ सप्टेंबर – श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुणे महापालिकेने सर्व क्षेत्रिय कार्यालय / प्रभागनिहाय श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि फिरते विसर्जन हौद यांची व्यवस्था केली आहे.  घरच्या घरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये, तसेच श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर उपलब्ध करण्यात आले आहे, तसेच प्रत्येक सोसायटीमधून निर्माल्य वेगळे घेण्याची सोय केली आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला शहरातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी रस्त्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉलमधील वगळून) पूर्ण दिवस चालू रहातील. हे सर्व आदेश खडकी आणि पुणे ‘कँटोन्मेंट बोर्ड’ हद्दीतील दुकांनाही लागू रहाणार आहेत.