विरोधी पक्ष भाजपकडून सभात्याग करत विरोध !
एकीकडे देशात बाल विवाहाला बंदी असतांना दुसरीकडे अशा प्रकारचे विधेयक संमत करून काँग्रेस मतांसाठी कायदे गुंडाळून ठेवण्याचाच प्रयत्न करत आहे. अशा कायद्यांच्या विरोधात आता जनतेनेच आवाज उठवणे आवश्यक आहे ! – संपादक
जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या विधानसभेमध्ये बाल विवाह नोंदणी विधेयक काँग्रेस सरकारने संमत करून घेतले. यामुळे राज्यात बाल विवाहाची माहिती विवाहाच्या ३० दिवसांत प्रशासनाला द्यावी लागणार आहे. भाजपने सभात्याग करत या विधेयकाला विरोध केला. या विधेयकामुळे बाल विवाहाला कायदेशीर मान्यता मिळू शकते, असे भाजपचे म्हणणे आहे.
काँग्रेस सरकारमधील संसदीय कार्यमंत्री शांती धारीवाल यांनी म्हटले की, हे विधेयक केवळ बाल विवाहाला नोंदणी करण्याची अनुमती देतो; मात्र यात कुठेही हे म्हटलेले नाही की, बाल विवाह वैध ठरवण्यात येतील. (जर असे आहे, तर मुळात नोंदणी तरी कशाला करण्यात येत आहे ? कुणी बाल विवाह करत असेल, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे ! – संपादक) बाल विवाह झाला असेल, तर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी संबंधित कुटुंबांच्या विरोधात आवश्यक कारवाई करू शकतील. (अशी कारवाई होणार असेल, तर कोण स्वतःहून नोंदणी करण्यासाठी प्रशासनाकडे जाईल ? – संपादक)