भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘७.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ झाला. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद कृष्ण पक्ष चालू होणार आहे.

(साभार : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. अनंतचतुर्दशी : उदयव्यापिनी भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथीला ‘अनंतचतुर्दशी’ व्रत करतात. हे काम्यव्रत असून ‘गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे’, यासाठी १४ वर्षे हे व्रत करतात. काही जण १४ वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करतात. या व्रतामध्ये अनंत, शेष आणि यमुना या देवतांचे पूजन करून दोर्‍याला १४ गाठी मारून अनंताचा दोरा धारण करतात. हे व्रत भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. हे व्रत अनेक ऋषींनी आचरिले आहे. १९.९.२०२१ या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी पहाटे ५.२९ वाजेपर्यंत चतुर्दशी तिथी आहे.

२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २०.९.२०२१ या दिवशी पहाटे ५.२९ पासून २०.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.२३ पर्यंत आणि २३.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.३८ पासून २४.९.२०२१ या दिवशी सकाळी ८.३० पर्यंत विष्टी करण आहे.

२ इ. प्रोष्ठपदी पौर्णिमा : भाद्रपद पौर्णिमेला ‘प्रोष्ठपदी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी पौर्णिमा तिथीला मरण पावलेल्या व्यक्तींचे महालय श्राद्ध करतात.

२ ई. संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ती : भाद्रपद पौर्णिमा तिथीला संन्यासव्रत घेतलेल्या व्यक्तींचा चातुर्मास समाप्ती दिन असतो. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन करून संन्यासी एकाच ठिकाणी दोन मास वास्तव्य करतात. आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमेपर्यंत संन्यासव्रत घेतलेल्या व्यक्तींचा चातुर्मास असतो.

२ उ. महालयारंभ : कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण आणि पूजन महालय श्राद्धात पिंडरूपात केले जाते. भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला महालयारंभ होते. २१.९.२०२१ पासून महालयारंभ आहे. भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या १५ दिवसांच्या कालावधीला ‘पितृपक्ष’ म्हणतात. पितृपक्षात महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सूर्य तूळ राशीत असेपर्यंत (१५.११.२०२१ पर्यंत) कोणत्याही तिथीला महालय श्राद्ध करता येते.

२ ऊ. इष्टी : इष्टी म्हणजे यज्ञ. यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो, त्यास ‘इष्टी’ म्हणतात. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा तिथीनंतर येणार्‍या प्रतिपदेला पंचांगात ‘इष्टी’ लिहिलेले असते.

२ ए. तुलायन : २२.९.२०२१ या दिवशी उत्तररात्री १२.५१ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) तुला राशीत प्रवेश करत आहे.

२ ऐ. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. ज्२४.९.२०२१ या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८.४८ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा, तसेच अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र आणि श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचावे. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.

२ ओ. भरणी श्राद्ध : पितृपक्षात भरणी नक्षत्रावर ‘गया श्राद्धाचे फल मिळावे’, या उद्देशाने भरणी श्राद्ध करतात. वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध करणे सयुक्तिक आहे. २४.९.२०२१ या दिवशी सकाळी ८.५४ नंतर भरणी नक्षत्र आहे.

२ औ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २४.९.२०२१ या दिवशी रात्री ८.५४ पासून २५.९.२०२१ या दिवशी सकाळी १०.३७ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.९.२०२१)