जेजुरी देवस्थानाची ११३ एकर भूमी त्यांना मिळणार !

  • सर्वाेच्च न्यायालयाचा देवस्थानाला दिलासा 

  • वहिवाटदारांकडून देवस्थानाला उत्पन्न देण्यास टाळाटाळ !

  • सरकारीकरण झालेली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांची स्थिती काय होऊ शकते ?, हे या उदाहरणातून लक्षात येते. यामुळे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक 
  • श्री मार्तंड देवस्थान समितीला मंदिराच्या भूमींची माहिती आणि त्यातून वहिवाटांद्वारे मिळणार्‍या उत्पन्नांची माहिती नसणे, हेच चुकीचे आहे. आतापर्यंत या दुर्लक्षामुळे देवस्थानाची प्रचंड हानी झाली आहे. याविषयी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. यातून बोध घेऊन इतर देवस्थानांनी स्वतःची भूमी कुठे आहे ? याचा शोध घेऊन ती भूमी देवस्थानांच्या नावाने करावी. – संपादक 
जेजुरी देवस्थान

जेजुरी (जिल्हा पुणे) – सर्वाेच्च न्यायालयाने देवालयांच्या भूमीप्रकरणी नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे येथील श्री मार्तंड देवस्थान समितीला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘देवस्थानची श्री खंडोबादेव, श्री मार्तंडदेव, श्री मल्हारीदेव, श्री खंडेरावदेव यांच्या नावे अनुमाने ११३ एकर भूमी आहे, तिचे हक्क देवस्थानाला मिळणार आहेत’, अशी माहिती विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली. समितीचे विश्वस्त झगडे यांनी जेजुरी देवस्थानच्या  भूमींचा शोध घेतला असता त्यांना ११३ एकर भूमी आढळली होती. ते न्यायालयात गेले असता त्यांना वरील निर्णय मिळाला.

विश्वस्त शिवराज झगडे पुढे म्हणाले की,

१. ‘महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये भूमी आहे’, अशी माहिती उपलब्ध कागदपत्रांवरून देवस्थान समितीने मिळवली आहे. शोध लागलेल्या भूमींमधून देवस्थानच्या तिजोरीत पुष्कळ उत्पन्न जमा होऊ शकते.

२. त्यासाठी सद्यःस्थितीत सदर भूमी कसत असलेल्या वहिवाटदारांनी देवस्थानशी संपर्क साधणे आवश्यक आहे. श्री खंडेरायाच्या नावे असलेल्या सर्व भूमी बागायती क्षेत्रातील आहेत. यांपैकी सणसर, सांगवी आणि पिसर्वे या गावांतील भूमी वगळता कोणतीही कागदपत्रे अथवा माहिती देवस्थानाकडे उपलब्ध नव्हती. माहिती अधिकार कायद्याचा वापर करत इतरत्र असलेल्या भूमींचा शोध लावत सर्व कागदपत्रे मिळवण्यात आली आहेत.

३. मु. सणसर (तालुका इंदापूर) येथे अनुमाने २२ एकर क्षेत्र देवस्थानच्या मालकीचे आहे; मात्र संबंधित लोक देवस्थानला उत्पन्न देण्यास टाळाटाळ करत आहेत.

४. तरंगवाडी (तालुका इंदापूर) येथे अनुमाने १४ एकर, सांगवी (तालुका फलटण) येथे अनुमाने २३ एकर; गिरवी (तालुका फलटण) येथे अनुमाने १२ एकर; देगाव (तालुका सातारा) येथे अनुमाने १३ एकर; लिंब (तालुका सातारा) येथे अनुमाने ३ एकर; चाकण (तालुका खेड) येथे अनुमाने ११ एकर; पिसर्वे (तालुका पुरंदर) येथे अनुमाने १४ एकर अशा विविध ठिकाणी अनुमाने ११३ एकर क्षेत्र जेजुरी देवस्थानाच्या मालकीचे आहे. गंभीर गोष्ट ही की, गिरवी आणि सांगवी (तालुका फलटण) येथील भूमींची परस्पर खरेदी-विक्री झाली आहे, तर काही भूमींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत.

५. देवस्थानाला या भूमींचा शोध लागल्यानंतर सरकारी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज देण्यात आले आहेत.

६. पिढ्यानपिढ्या भूमी कसत असलेल्यांकडून निदान प्रतिवर्षी उत्पन्न देवस्थानच्या तिजोरीत जमा व्हावे, या उद्देशाने संबंधित शेतकर्‍यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. पुढील कायदेशीर प्रक्रिया विश्वस्त मंडळाकडून राबवण्यात येणार असून सहधर्मादाय आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.