पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील संतपिठाचा अभ्यासक्रम चालू होणार !
मुंबई – पैठण येथील संतपिठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्त्वज्ञान आदी गोष्टींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाकडे ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे. यासाठीचा व्यय विद्यापिठाला स्वनिधीतून करावा लागणार असून संतपिठाच्या जागेची, तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे सोपवण्याची सूचना केली होती.
केवळ शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी ज्ञानेश्वर उद्यानाजवळ १७.८ एकर भूमी संपादित करण्यात आली आहे. संतपिठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकाम यांसाठी ६ कोटी रुपयांच्या व्ययासही मान्यता देण्यात आली होती.