७३ सहस्र ८७९ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई, १६ सप्टेंबर (वार्ता.) – महावितरणसमोर सध्या एकूण ७३ सहस्र ८७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे; मात्र वीजदेयकाच्या थकबाकीचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास राज्य अंधारात जाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी बोलून दाखवली. (एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी शेष असेपर्यंत महावितरण आस्थापन काय करत होते ? संबंधित थकबाकीदारांची नावे सरकार जाहीर करणार का ? हा प्रामाणिक देयक भरणार्यांना भुर्दंडच असणार आहे. – संपादक) राज्य सरकार या प्रकरणी गंभीर झाले असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यशासनाच्या ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत तीनही वीज वितरण अस्थापनांसमोर थकबाकी आणि कर्जाचे डोंगर वाढत आहेत. ही स्थिती चिंताजनक बनल्याची गोष्ट उजेडात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध सदस्यांसमोर महावितरण अस्थापनाच्या आर्थिक स्थितीविषयी सह्याद्री अतिथीगृहात एक सादरीकरण करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.