-
चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने यंदा विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती जमा केल्या नाहीत !
-
केवळ एका ठिकाणी उभारला कृत्रिम तलाव
-
कृत्रिम तलावात एकही श्री गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आली नाही
-
हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम !
चिपळूण, १६ सप्टेंबर (वार्ता.) – येथील गणेशोत्सवातील पाचव्या दिवशी श्री गणेशमूर्ती आणि गौरी यांचे विसर्जन वाशिष्ठी नदीच्या पात्रातील वहात्या पाण्यात करण्यात आले. मागील वर्षी नगर परिषदेकडून श्री गणेशमूर्ती जमा करण्यासाठी कचर्याच्या गाड्या वापरण्यात आल्या होत्या. यास हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना ‘श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करणे, हा गणेशभक्तांचा धार्मिक अधिकार असल्याने अशा प्रकारे श्री गणेशमूर्ती जमा करणे अशास्त्रीय आहे’, असे सांगून त्यांचे प्रबोधन केले होते. यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाआधीच नगरपरिषद प्रशासनाला श्री गणेशमूर्ती जमा न करण्याविषयीचे निवेदन देऊन सतर्क केले होते. याचाच परिणाम म्हणून यावर्षी प्रशासनाने विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती जमा न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे श्री गणेशमूर्ती जमा केल्या नाहीत.
एकमेव कृत्रिम तलावात एकही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नाही !
शासनाचा आदेश म्हणून नगरपरिषद प्रशासनाने केवळ एका ठिकाणी एका बाजूला छोटा कृत्रिम तलाव निर्माण केला होता; मात्र नागरिकांना या कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सक्ती केली नाही आणि प्रतिवर्षीप्रमाणे ध्वनीक्षेपकाद्वारे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहनही केले नाही. त्यामुळे सर्वच हिंदूंनी धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केले. (कोकणात ठिकठिकाणी नैसर्गिकरित्या वहाते पाणी असतांना आणि वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याची परंपरा असतांना कृत्रिम तलावाचा अट्टाहास प्रशासन कशासाठी करते ? अशा कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी होणारा व्यय (खर्च) असे निर्णय घेणार्या प्रशासकीय अधिकार्यांकडूनच वसूल करायला हवा ! – संपादक)