तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादा आणि उपपंतप्रधान बरादर गायब !

डावीकडून हैबतुल्लाह अखुंदझादा आणि मुल्ला अब्दुल घनी बरादार

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन करण्यात आले असले, तरी त्यातील दोन महत्त्वाचे नेते गायब असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला (इस्लामी विद्वान) हैबतुल्लाह अखुंदझादा आणि सध्याच्या सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादार हे दोघे मागील काही दिवसांपासून गायब असून सार्वजनिक ठिकाणी त्यांना कुणीही पाहिलेले नाही. त्यामुळे ‘हे नेते नेमके कुठे आहेत ?’ ‘त्यांच्यासमवेत काही घातपात झाला का ?’ अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे.

१. तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळवल्यापासून सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्लाह अखुंदजादा गायब आहे; मात्र नवीन सरकारच्या घोषणेनंतर अखुंदजादा याच्या वतीने जाहीर निवेदन जारी करण्यात आले होते. ‘अखुंदजादा लवकरच सार्वजनिक पद्धतीने लोकांसमोर उपस्थित होणार आहेत’, अशी माहिती तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने पत्रकार परिषदेत दिली होती; पण अद्याप तो समोर आलेला नाही.

२. ‘उपपंतप्रधान मुल्ला घनी बरादार मारला गेला आहे किंवा गंभीररित्या घायाळ झाला आहे’, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी बरादार आणि आतंकवादी संघटना हक्कानी नेटवर्क यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
दुसरीकडे मुल्ला बरादार याने एक ऑडिओ संदेश जारी करत ‘मी ठीक आहे’, असे सांगितले होते.