मोकाट गुरे उचलून गोशाळांच्या कह्यात देण्याचा गोवा शासनाचा निर्णय

सर्वाधिक प्रमाणात गुरे असणार्‍या ठिकाणांवरील गुरे उचलण्याला प्राधान्य देणार

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १४ सप्टेंबर (वार्ता.) – रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही मोकाट गुरे अपघातांना निमंत्रण देत असल्याने त्यांना अगोदर हटवून रस्ते मोकळे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात गुरे रस्त्यावर असतात, अशा उत्तर गोव्यात १० आणि दक्षिण गोव्यात १० मिळून २० जागा निवडण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून या गुरांना उचलून ती गुरांचे पालनपोषण करणार्‍या गोशाळांच्या कह्यात दिली जातील. त्यासाठी गोशाळांना वाढीव अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

४ दिवसांपूर्वी पंचायत संचालनालय, पालिका प्रशासन आणि पशूसंवर्धन खात्याचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पशूसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. या बैठकीला अशासकीय संस्थांचे आणि गोशाळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. गुरांच्या देखभालीसाठी एका गुरामागे प्रतिदिन ७५ रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिले जात होते, ते वाढवून आता प्रतिदिन १५० रुपये करण्यात आले आहेत. त्यात वैद्यकीय खर्च आणि सेवेकर्‍यांसाठीचा खर्च यांचा समावेश आहे. गुरे उचलून आणणार्‍यास गोशाळांकडून पैसे दिले जात होते. आता शासनाकडून २ सहस्र रुपये दिले जातील, तसेच घायाळ झालेल्या गुरांवर उपचार आणि त्यांचे पालनपोषण यांसाठी ५ सहस्र रुपये दिले जातील. गोवंशाचा मृत्यू झाल्यास त्याला पुरण्याचा खर्च ३ सहस्र रुपये दिला जाणार आहे, तसेच साधनसुविधा खर्च हा वर्षाकाठी ५ सहस्र रुपयांवरून वाढवून ७ सहस्र रुपये करण्यात आला आहे.

गोशाळांकडून शासनाचे आभार !

गोशाळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे गोशाळांनी स्वागत केले आहे. गोमंतक गोसेवक महासंघाचे प्रमुख कमलाकांत तारी यांनी सांगितले की, अनुदान वाढवण्याच्या निर्णयामुळे गोशाळांना मोठा दिलासा मिळाला आहे, तसेच हॉटस्पॉट निवडण्याचा निर्णय अनेक गुरांचे प्राण वाचवणारा ठरणार आहे.