सोलापूर – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचगाव (टेकडी) येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज (वय ९७ वर्षे) यांनी १३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. रात्री ७ वाजता त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर त्यांनी देहत्याग केला. १४ सप्टेंबर या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प.पू. रामानंद सरस्वती यांनी चिंचगाव (टेकडी) येथील लहान महादेव मंदिराचा विस्तार करून चिंचगाव (टेकडी) ‘आध्यात्मिक क्षेत्र’ म्हणून नावारूपाला आणले. येथेच महाराजांचा मोठा सत्संग आश्रम आहे.
प.पू. रामानंद सरस्वती महाराज हे मागील ५५ वर्षांपासून चिंचगाव (टेकडी) येथे वास्तव्यास होते. त्यांनी चिंचगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. प्रत्येक पौर्णिमेला सत्संग आणि सप्ताह आयोजित करून त्यांनी समाजात अध्यात्माविषयी जागृती केली. त्यांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण परिसराला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला होता.
प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याशी असलेला ऋणानुबंध !
१. प.पू. रामानंद सरस्वती महाराज हे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी सनातन संस्थेच्या साधकांना महादेव मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यास सांगत होते. या वेळी महाराजांनी त्यांच्या अनुयायांना प्रदर्शनाच्या ठिकाणी असलेल्या सनातनच्या साधकांची जेवण आणि चहा यांची व्यवस्था करण्यास सांगत असत. त्यांच्या सहकार्यामुळे चिंचगाव (टेकडी) परिसरातील अनेक लोकांपर्यंत सनातन संस्थेचे कार्य पोचले.
२. प.पू. रामानंद सरस्वती महाराज सनातन संस्थेचे कार्य आणि साधक यांचे नेहमी कौतुक करत असत. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करत असत, तसेच सनातन संस्थेचे प्रसारसाहित्यही वापरत असत.
३. वर्ष २००७ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु धर्मजागृती सभे’मध्ये प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
४. प.पू. रामानंद सरस्वती महाराज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला नेहमी आशीर्वाद देत असत.