नागपूर – भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद गमवावे लागलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत ?, याचा शोध अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) घेतला जात आहे; मात्र अनेक वेळा नोटीस बजावूनही ते ‘ईडी’समोर उपस्थित राहिलेले नाहीत. अद्यापही ‘ईडी’ला त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. (राष्ट्रीय स्तरावरील एका यंत्रणेला एका राज्याच्या माजी मंत्र्याचा ठावठिकाणा सापडत नाही, हे लज्जास्पद नव्हे का ? – संपादक) या पार्श्वभूमीवर देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ‘ईडी’ने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) साहाय्य मागितले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, ‘ईडी’ने ‘सीबीआय’कडे साहाय्य मागणे हास्यास्पद आहे. न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख ‘ईडी’समोर उपस्थित रहाणार नाहीत. प्रवीण कुंटे पुढे म्हणाले की, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आले नाहीत. ‘ईडी’च्या पथकांनी अन्वेषणासाठी अनेक वेळा त्यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी घातल्या; मात्र त्यांच्या हाती ठोस असे काहीही लागले नाही. अनिल देशमुख महाराष्ट्रात आहेत कि महाराष्ट्राबाहेर ? यासंदर्भात आमच्याकडे कुठलीही माहिती नाही; मात्र ते भारतातच आहेत. योग्य वेळी ते ‘ईडी’समोर येतील. अनिल देशमुख यांच्याशी गेल्या २-३ मासांपासून कुठल्याही संपर्क झालेला नाही. (अनिल देशमुख यांच्याशी संपर्क झालेला नसतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत अनिल देशमुख ‘ईडी’समोर उपस्थित रहाणार नाहीत’, असे इतक्या ठामपणे कसे सांगू शकतात ? – संपादक)