साकीनाका घटनेतील क्रूरकर्म्याला देहदंडाची शिक्षा द्या ! – छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे खासदार

छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – साकीनाका येथील महिलेवर अमानुष पद्धतीने बलात्कार करून अत्याचार करण्यात आले. नंतर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचे निधन झाले. या घटनेतील संशयित क्रूरकर्म्याला देहदंडाची शिक्षा द्या, अशा शब्दांत भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे दु:खही होते आणि खेदही वाटतो. राज्यातील माता-भगिनी असुरक्षित असतील, तर आपण विकासाच्या गप्पा काय मारतो ? स्त्री दाक्षिण्य मानणार्‍या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या घटनांना सरकार उत्तरदायी आहेच; मात्र संपूर्ण समाज आणि मानवजातही उत्तरदायी आहे. कायदा आंधळा आहे; मात्र तो नेहमीच न्यायिक निवाडा करतो. अशा प्रवृत्तींना जरब बसेल, अशा शिक्षांची तरतूद ‘आय.पी.सी. – १८६०’ मध्ये झाली पाहिजे.’’