धार (मध्यप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या पुजार्‍याचा अज्ञातांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू  

भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्‍यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

धार (मध्यप्रदेश) – धार जिल्ह्यातील ज्ञानपुरामधील हनुमान मंदिराचे ६५ वर्षीय पुजारी अरुणदास यांची अज्ञातांनी अमानुष मारहाण करून हत्या केली. पुजार्‍याला वाचवतांना मंदिराचा चौकीदार घायाळ झाला आहे.

१२ सप्टेंबरच्या रात्री मंदिराजवळ असलेल्या काही जणांना पुजारी अरुणदास यांनी ‘येथे काय करत आहात ?’, असे विचारले. त्या वेळी त्यांनी पुजार्‍याला शिवीगाळ केली आणि नंतर काठ्यांद्वारे अमानुष मारहाण केली. या वेळी त्यांना वाचवण्यासाठी चौकीदार राहुल गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. यात हे दोघे घायाळ झाल्यावर गावकर्‍यांनी त्यांना रुग्णालयात भरती केले असता पुजारी अरुणदास यांचा मृत्यू झाला. मूळचे उत्तरप्रदेशातील असणारे अरुणदास गेल्या ६ – ७ वर्षांपासून मंदिरात पुजारी म्हणून सेवा करत होते.