सातारा, १३ सप्टेंबर (वार्ता.) – क्षेत्र माहुली या गावातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि नगरपालिका शाळा क्रमांक ७ मधील शिक्षिका सौ. वैशाली सुतार यांना ‘जायन्टस् ग्रुप’च्या वतीने ‘आदर्श शिक्षक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनाचे म्हणजेच ‘शिक्षकदिना’चे औचित्य साधून कोरोनाचे नियम पाळत सौ. सुतार यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे ‘जायन्टस् ग्रुप’च्या संकल्पनेनुसार सौ. वैशाली यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई गोरख सुतार यांच्या शुभहस्ते आणि ‘जायन्टस् ग्रुप’च्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सौ. वैशाली यांना प्रदान करण्यात आला. ‘जायन्टस् ग्रुप’चे पुरस्कार प्रदान सोहळ्याचे हे प्रथम वर्ष असून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘शिक्षकांना प्रोत्साहन मिळून राष्ट्रप्रेमी पिढी घडावी यासाठी सर्वगुणसंपन्न शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो’, असे ‘ग्रुप’च्या सदस्यांनी सांगितले.
हा केवळ पुरस्कार नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद ! – सौ. वैशाली सुतार
मनोगत व्यक्त करताना सौ. वैशाली सुतार म्हणाल्या, ‘‘हा केवळ पुरस्कार नसून भगवान श्रीकृष्णाने माझ्या सेवेची घेतलेली नोंद आहे. माझ्या आयुष्याची जीवननौका वल्हवण्याची प्रेरणा तोच देत असतो. या घनघोर आपत्काळातही मला भगवान श्रीकृष्णाचे काया, वाचा आणि मन यांना संरक्षण प्राप्त झाले आहे. मुळातच आई-वडिलांच्या घरातून लाभलेल्या साधनेसाठी पोषक वातावरणामुळे मला साधनेची आवड, तळमळ होती; मात्र ती योग्य दिशेनी आहे किंवा नाही, हे समजत नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेच्या विविध सत्संगांतून मौल्यवान मार्गदर्शन लाभले. त्यातूनच पुढे आध्यात्मिक बैठकीला विचारांनी आणि कृतीला निश्चित दिशा प्राप्त झाली. परात्पर गुरू डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळेच हे शक्य झाले. मला मिळालेला पुरस्कार हा पुरस्कार नसून भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे, असे मी समजते. या सर्वाचे श्रेय भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मी अर्पण करते.’’ त्यानंतर सौ. सुतार यांनी ‘पुढील कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित अशी कृती माझ्याकडून घडू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.