अफगाणिस्तानातून शेवटचा यहुदी नागरिकही बाहेर पडला !

ज्यू नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा

न्यूयॉर्क – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे वास्तव्य करत असलेले अल्पसंख्य समाजातील अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. तेथे रहात असलेल्या ज्यू समुदायाच्या शेवटच्या नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा यानेही देश सोडला आहे. त्यामुळे आता तेथे एकही यहुदी शिल्लक नाही आहे.

अफगाणिस्तानातील शेवटचा यहुदी नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा हा इस्रायली-अमेरिकी व्यावसायिक होता. अफगाणिस्तान सोडतांना त्याला विशेष सुरक्षा देण्यात आली होती.

वृत्तसंस्थेशी बोलतांना अमेरिकेतील खाजगी सुरक्षा आस्थापना चालवणार्‍या मोती कहाना यांनी सांगितले, ‘ज्यू नागरिक सिमेंटोव्ह हा अनेक दशकांपासून अफगाणिस्तानमध्ये रहात होता. त्याने सोव्हिएत संघाने केलेले आक्रमण, प्राणघातक गृहयुद्ध, यापूर्वीचे तालिबानचे क्रूर शासन आणि अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानवर मिळवलेले नियंत्रण पाहिले. त्या स्थितीतही त्याने देश सोडण्याचा विचार केला नाही. आताही तो देश सोडण्यास सिद्ध नव्हता. ‘इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांकडून तुझ्या जिवाला धोका आहे’, हे मी त्याला सांगितले. हे त्याला पटले. त्यामुळे त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला.’