सातारा, ८ सप्टेंबर (वार्ता.) – अनुमाने दीड मासाच्या प्रतिक्षेनंतर ७ सप्टेंबरपासून महाबळेश्वर येथील अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या केवळ हलक्या वाहनांना या रस्त्यावरून वाहतुकीसाठी अनुमती देण्यात आली असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हा रस्ता चालू झाल्यामुळे प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांच्या अडचणी सुटल्या आहेत.
जुलैमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे अंबेनळी घाटाची अतोनात हानी झाली होती. २१ जुलैपासून हा रस्ता अनेक ठिकाणी दरीत कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या २२ गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. ही २२ गावे पुरामुळे प्रभावित झाली होती; मात्र यांना साहाय्य पोचवण्यासाठी कोकणातील २ जिल्हे ओलांडून अनुमाने ३०० किलोमीटरचा प्रवास करून जावे लागत होते. काही ठिकाणी तर १४ किलोमीटर डोंगर उतरून साहाय्य पोचवावे लागत होते, तसेच सातारा जिल्ह्यातून प्रतिदिन कोकणात होणारी तरकारी वाहतुकही बंद पडली होती. किल्ले प्रतापगड येथील पर्यटन बंद पडले होते. या घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले. दाट धुके, मुसळधार पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही न डगमगता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. प्रशासकीय अधिकार्यांनी कामाची पहाणी केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.