पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे; मात्र अशा मूर्तीं राज्यात नाहीत, असे ठामपणे सांगणे कठीण आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केलेले नाहीत. राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री झाल्याची तक्रारही आलेली नसल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. (तक्रार आल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ तपासणी करणार का ? अशा कारभाराने प्रदूषण कसे टाळणार ? जसा लाच देणारा आणि लाच घेणारा त्याविषयी तक्रार करत नाही, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती घेणारा आणि ती विकणारा दोघेही गप्पच बसणार ! – संपादक)
राज्यशासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पर्यावरणीय दुष्परिणाम ओळखून ‘पर्यावरण संरक्षण कायदा १९८६’ अंतर्गत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदीच्या घातली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणार्याला एक लक्ष रुपये दंड आणि ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. या बंदीच्या आदेशाचे यंदा कठोरतेने पालन करणार असल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण खाते अन् गोवा हस्तकला महामंडळ यांनी संयुक्तपणे गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी जागृती करून शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवण्यास प्रोत्साहन दिले आहे. याविषयी मूर्तीकारांमध्ये जागृती झालेली असल्याने यंदा राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती कुठल्याही चित्रशाळेत दिसणार नाहीत किंवा भाविक त्या पुजणार नाहीत, अशी शासनाची अपेक्षा आहे.
गोवा हस्तकला महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉम्निक फर्नांडिस म्हणाले, ‘‘सध्या गोवा हस्तकला महामंडळ श्री गणेशमूर्तींची ठिकठिकाणी जाऊन पहाणी करत आहे आणि महामंडळाला आतापर्यंत केवळ चिकणमातीच्या श्री गणेशमूर्ती आढळल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आढळलेल्या नाहीत.’’ गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींविषयी पोलिसांकडे अजून एकही तक्रार आलेली नाही. अशा मूर्ती विक्रीस आल्यास पोलीस त्या कह्यात घेऊन मंडळाकडे पाठवतात.’’