जिल्ह्यातील ५ सहस्रांहून अधिक तपासण्या प्रतिक्षेत
कोरोना महामारीच्या काळात प्रयोगशाळा चालू करण्यासाठी प्रयत्न न करणार्यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक
सातारा, ६ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आरोग्य विभागाने गांभीर्याने सेवा केली. शासनानेही सुविधा वाढवत नेल्या. कोरोना काळात आरोग्य विभागाने सहस्रो कर्मचार्यांची भरती केली. त्यामुळे कामाला गती आली. याचा लाभ दुसर्या लाटेतही झाला; मात्र यानंतर सरकारी आणि खासगी आरोग्ययंत्रणेला शिस्त राहिली नाही. सतत मृत्यूची आणि बाधित यांची आकडेवारी यांमधील घोळ समोर येत राहिला. आता आरोग्य विभागातील कर्मचार्यांना कामावरून कमी केल्यामुळे कोट्यवधी रुपये व्यय करून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेली आर्.टी.पी.सी.आर्. ‘लॅब मशीन’ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ सहस्रांहून अधिक कोरोना स्रावाचे नमुने पडताळणी करायचे राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. (या समस्येविषयी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना काढावी ही अपेक्षा ! – संपादक)
सध्या १० सहस्रांहून अधिक तपासण्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत. दैनंदिन शेकडो रुग्ण बाधित होत आहेत. सध्या ९ सहस्रांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागातील ‘लॅब टेक्निशियन’, ‘डाटा ऐंट्री ऑपरेटर’, आरोग्यसेवक अशा पदांची भरती करण्यात आली होती; मात्र १ मासापूर्वी कोणतीही कल्पना किंवा नोटीस न देता अचानक सरकारी निर्णयानुसार त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्याचा परिणाम कोट्यवधी रुपये व्यय करून जिल्ह्यात आणलेल्या आर्.टी.पी.सी.आर्. यंत्रावर झाला आहे.