मुंबई येथील रामचंद्र प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !
मुंबई – बंदीवानांचे मानसिक परिवर्तन करून त्यांच्यात देशभक्ती वृद्धींगत व्हावी आणि भविष्यात हे मनुष्यबळ समाज अन् देश हितासाठी उपयोगात यावे, यासाठी येथील रामचंद्र प्रतिष्ठानकडून नाशिक रोडमधील मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानकडून बंदीवानांना स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच अन्य क्रांतीकारकांचे ग्रंथ भेट देण्यात आले. (खरेतर असे कार्यक्रम प्रशासनाने नित्यपणे राबवायला हवेत. हिंदु राष्ट्रात राज्यकर्ते राष्ट्राभिमानी असल्याने कारागृहात प्रशासनाकडून असे कार्यक्रम राबवले जातील. – संपादक)
क्रांतीकारक ज्या कारणास्तव कारागृहात होते, त्याची जाणीव होऊन बंदीवानांमधील राष्ट्रभक्तीपर विचार जागृत होऊन ते शब्दांत उतरावेत, यासाठी ही निबंध स्पर्धा घेण्यात आली, असे रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी रामचंद्र प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मंदाकिनी भट, शोभा नाखरे, सुलभाताई लोंढे-जोशी, मानसोपचारतज्ञ रिमा सावंत, संचालिका नयना शिंदे, अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडून अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, शिक्षक हेमंत पोतदार, अधिकारी संतोषी कोळेकर यांनी सहकार्य केले. (चांगल्या कार्यक्रमांच्या आयोजनाला सहकार्य करणार्या प्रशासकीय अधिकार्यांचा आदर्श सर्व प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा ! – संपादक) रामचंद्र प्रतिष्ठानद्वारे मागील ३ वर्षांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत असून त्याला बंदीवानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.