पाकिस्ताननेच तालिबानला पोसले ! – भारताचा आरोप

असे आरोप करून तालिबान आणि पाक यांच्यावर काहीच परिणाम होत नाही अन् होणारही नाही ! त्यापेक्षा पाकला नष्ट करण्यासाठी भारताने काही प्रयत्न केले, तर ते योग्य ठरेल ! – संपादक

भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यांनीच तालिबानला पोसले आहे. अशाच अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्या ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांचाही यांत समावेश आहे. या दोन गटांनी पूर्वीही अफगाणिस्तानात भूमिका बजावली आहे, आताही त्यांचे तेथे लक्ष असेलच ! पाकिस्तानकडे त्या दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे, अशा शब्दांत भारताने पाकवर टीका केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ही टीका केली आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले शृंगला हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांचीही भेट घेतली.

शृंगला म्हणाले की, अफगाणिस्तानातील स्थितीवर भारत आणि अमेरिका यांचे  बारकाईने लक्ष आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या पष्कळ अस्थिर आणि संदिग्ध आहे. भारत इतक्यात तरी तेथे कोणत्याही स्वरूपाचा सहभाग घेण्याची शक्यता नाही.