गणेशभक्तांसाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा नामजप उपलब्ध होणार 

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

  • ‘श्री गणेशाय नमः ।’ हा तारक रूपातील नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध होणार !

‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गणेशाय नमः ।’ हा तारक स्वरूपातील नामजप ध्वनीमुद्रित केला असून तो सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. हा नामजप मध्यम गतीचा आहे. ज्यांना हा जप जलद गतीने म्हणायचा आहे, त्यांनी याच पद्धतीने जलद गतीत म्हणावा; पण जप म्हणण्याची पद्धत पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग !’ असा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या पद्धतीने नामजप केल्यावर तुमचा भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या पद्धतीने नामजप म्हणावा.

हा नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप या दोन्ही ठिकाणी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी उपलब्ध होणार आहे.