– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वेदांचे उच्चार योग्य करण्यासाठीचे पाठकात आवश्यक असलेले सहा गुण
माधुर्यमक्षरव्यक्तिःपदच्छेदस्तुसुस्वर: ।
धैर्यंलयसमर्थंच षडेते पाठका गुणा: ।। – पाणिनीय शिक्षा अर्थ
१. वाणीमध्ये माधुर्य (कर्कश आवाजात म्हणू नये.)
२. स्पष्ट उच्चार (समोरच्याला अक्षरन् अक्षर ऐकू जाईल असे म्हणणे.)
३. योग्य ठिकाणी पदच्छेद (मंत्राचे पूर्वनिर्धारित पद्धतीनेच भाग पाडणे) करणे
४. सुस्वर (योग्य ठिकाणी योग्य प्रकारे स्वर देणे)
५. धैर्य (‘मी चुकीन का ?’ आदी भीती मनात न बाळगता आत्मविश्वासपूर्ण आणि अस्खलित म्हणणे)
६. लयसंपन्नता (मंत्र म्हणायला प्रारंभ करतांना जी गती, आवाजाची पट्टी होती, त्याच लयीत शेवटपर्यंत म्हणणे)
वेदांचे उच्चार करण्याची अयोग्य पद्धत – पाठकाचे सहा दोष
गीती शीघ्री शिर: कम्पी तथा लिखित पाठकः ।
अनर्थज्ञोऽल्पकण्ठश्च षडेते पाठकाधमाः ।।
अर्थ
१. मंत्र गायनाप्रमाणे म्हणणे
२. मंत्र जलद गतीने म्हणणे
३. मंत्रांचे स्वर देतांना (उदात्त (शब्दावर जोर वर घेणे) आणि अनुदात्त (शब्दावरचा जोर खाली घेणे)) डोके हलवत म्हणणे
४. पुस्तकावरून मंत्र म्हणणे (सर्व मंत्र मुखोद्गत करून म्हणणे शास्त्रकारांना अपेक्षित आहे.)
५. मंत्रांचा अर्थ न जाणता ते उपयोगात आणणे
६. न्यून (हळू) आवाजात म्हणणे
स्थाणुरयं भारहारः किलाभूत, अधीत्यवेदं न विजानातियाऽर्थम् ।
याऽर्थज्ञ इत् सकलं भद्रमश्नुते नाकमेति ज्ञानविधूत पाप्मा ।।
अर्थ : अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे. जो अर्थ जाणतो, तो कल्याणकारक गोष्टी प्राप्त करणारा होतो आणि ज्ञानाच्या सामर्थ्यावर स्वतःला पापांपासून मुक्त करून उच्च लोकात जातो.
(संदर्भ : ग्रंथ – निरुक्त)