मौजमजेसाठी पुणे येथील अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० लाख रुपयांच्या दुचाकी !

लाखो रुपये मूल्याच्या वस्तू चोरण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असणे चिंताजनक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे), १ सप्टेंबर – मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरी करणा‍र्‍या २ अल्पवयीन मुलांना शिंदेवस्ती मारुंजी येथून दुचाकी चोरून ते हिंजवडी येथे जात असतांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी हिंजवडी, वाकड, तळेगाव येथून दुचाकी चोरल्याचे मान्य केले आहे. त्यांनी केलेले १४ गुन्हे उघडकीस झाले आहेत. यातील एका अल्पवयीन मुलावर हत्येचा गुन्हाही नोंद आहे. (पहिल्याच गुन्ह्यात कठोर कारवाई न झाल्याने गुन्हेगार पुढील गुन्हे करण्यास धजावतात. हे टाळण्यासाठी पहिल्याच गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा हवी. – संपादक)

दुसर्‍या कारवाईत गोविंद धाड याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी कह्यात घेतली. या तिघांकडून १० लाख ३५ सहस्र रुपये मूल्याच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (अल्पवयीन मुले एवढ्या दुचाकींची चोरी करेपर्यंत पोलिसांना थांगपत्ता लागला नाही म्हणजे पोलीस निष्क्रीय आहेत, असे लक्षात येते. – संपादक)