‘मी ३ वर्षांपासून देवद येथील सनातन आश्रमात, तर माझी पत्नी सौ. संगीता आणि मुलगी कु. तेजस्विनी रामनाथी येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. ६.२.२०२० या दिवशी माझा मुलगा चि. प्रशांत याचा विवाह चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि.सौ.कां. प्रेरणा पाटील (आताची सौ. राधिका चव्हाण) हिच्याशी देवद येथील सनातन आश्रमात झाला. सध्या मुलगा आणि सूनही रामनाथी आश्रमातच सेवा करतात. अशा प्रकारे आमच्या कुटुंबाला परात्पर गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले हेच) सांभाळत आहे. प्रशांतच्या विवाहाच्या प्रसंगी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. मुलाच्या विवाहाचे नियोजन आणि सर्व सिद्धता पाहिल्यावर ‘सर्व देवच करून घेत असतो, तरी मी उगाचच काळजी करत होतो’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होऊन भावाश्रू येणे
देवद आश्रमातील साधकांनी माझ्या मुलाच्या विवाहाच्या दिवशी केलेली सर्व सिद्धता पाहून मला वाटले, ‘सर्व नियोजन साधकांनी उत्तम प्रकारे केले आहे. सर्व देवच करून घेत असतो, तरी मी उगाचच काळजी करत होतो.’ विवाहासाठी लागणार्या सर्व वस्तूंची केलेली मांडणी पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.
२. विवाहाचे विधी चालू असतांना संपूर्ण वातावरण चैतन्यमय जाणवणे आणि तिथे देवता, संत अन् परात्पर गुरुमाऊली यांचे अस्तित्व जाणवणे
विवाहाचे विधी चालू असतांना मला तिथे देवतांचे अस्तित्व जाणवत होते आणि सर्वत्र चैतन्यरूपी पिवळा प्रकाश दिसत होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते आणि मनाला शांत वाटत होते. विवाहाला आरंभ झाल्यावर मला रामनाथी आश्रमातील सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ) अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांचे अस्तित्व जाणवत होते. ‘तिथे उपस्थित असलेले सनातनचे संत पू. गुरुनाथ दाभोलकरकाका आणि पू. रमेश गडकरीकाका यांच्या ठिकाणी अनुक्रमे प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते. त्या वेळी उपस्थित सर्व साधकही भावावस्थेत असल्याचे मला दिसत होते. सर्व देवदेवता, सर्व संत आणि परात्पर गुरुमाऊली विवाहाला उपस्थित असल्याचे पाहून मीही भावावस्थेतच होतो. ‘विवाहाचा कार्यक्रम कसा पार पडला’, हे मला समजले नाही. त्या प्रसंगी ‘सर्वकाही गुरुमाऊलीने करून घेतले आहे’, असे मला अनुभवायला मिळाले.
३. विवाहानंतर छायाचित्र काढायच्या प्रसंगी सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे दर्शन होणे
विवाहानंतर छायाचित्र काढायच्या प्रसंगी सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार या प्रशांत आणि सौ. राधिका यांच्यामध्ये उभ्या होत्या. तेव्हा ‘त्यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवी उभी आहे’, अशी अनुभूती मला आली. त्या वेळी माझ्या मनात कोणताही मायेचा विचार नव्हता. ‘सनातनचे साधक हाच माझा परिवार आहे’, असे मला वाटत होते.’
– श्री. शिवाजी लक्ष्मण चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०२०)
|