विवाहापूर्वी विकृत स्वरूपात छायाचित्रे काढण्याऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे आचरण करणे आवश्यक ! – संपादक
विवाह म्हटला की, छायाचित्रे काढणे किंवा ध्वनीचित्रीकरण करणे, हे ओघाने आलेच ! त्यातील आनंद घेऊन विवाहसोहळा पार पडतो. सध्या सर्वत्र ‘प्री वेडिंग फोटोशूट’ (विवाहाच्या आधी वधू-वरांनी विविध प्रकारची छायाचित्रे काढणे) ही पद्धत सगळीकडे पहायला मिळते. मध्यंतरी एका सामाजिक संकेतस्थळावर ‘प्री वेडिंग फोटोशूट’ची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यात होणार्या वधू-वरांनी नागाच्या प्रतिकृतीसमवेत छायाचित्रे काढली आहेत. त्या दोघांनी ती प्रतिकृती हातात धरली आहे, असे एक छायाचित्र आहे. एका छायाचित्रात होणार्या वधूने नागाच्या मागील बाजूस ओठांनी स्पर्श केला आहे. पुढील एका छायाचित्रात नागाने होणार्या वराला दंश केलेला आहे आणि त्यानंतरच्या छायाचित्रात एका ‘स्ट्रेचर’वर त्या दोघांचेही मृतदेह चादरीने झाकलेल्या स्थितीत ठेवलेले आहेत. थोडक्यात काय, तर नागाच्या प्रतिकृतीच्या समवेत छायाचित्रे काढून शेवटी स्वतःचा मृत्यू ओढावला, असे त्यात दाखवले आहे. ‘सर्व छायाचित्रे म्हणजे अघोरी प्रकारच आहे’, असे वाटते. विवाहाच्या माध्यमातून वधू-वर नव्या आयुष्यात पदार्पण करत असतात. नव्या आयुष्याचा स्वीकार आनंदाने करायचा असतो; परंतु येथे नव्या आयुष्याचे स्वागत करणे तर दूरच, स्वतःचाच मृत्यू झाल्याचे दाखवून आनंदावर जणू विरजणच पाडले आहे. नव्या आयुष्याचा प्रारंभ करतांना आयुष्याचाच शेवट दाखवला जाणे, अशा छायाचित्रांना नेहमीप्रमाणे ‘लाईक्स’ (आवडल्याचे) आणि ‘कमेंट’ (अभिप्राय) मिळण्याची संख्या वाढणे यातून सध्याच्या पिढीच्या विचारांची दिशा किती भरकटलेली आहे, हे लक्षात येते.
खरेतर ‘प्री वेडिंग फोटोशूट’ ही पद्धत मुळात भारतीय नसून पाश्चात्त्यांचे अंधानुकरणच आहे. त्यामुळे त्यातून विशेष असे काय साध्य होणार ? विवाहाच्या माध्यमातून शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले जातात. त्याद्वारे वैवाहिक आयुष्यात सुख, शांती, समाधान, भरभराट आणि समृद्धी लाभते; परंतु सध्याच्या काळात शुभ गोष्टींचा स्वीकार न करता अनिष्ट शक्तींनाच स्वतःच्या आयुष्यात आमंत्रण दिले जाते. वरील प्रकारे छायाचित्रांच्या माध्यमातून स्वतःचा मृत्यू दाखवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे. नागाच्या प्रतिकृतीच्या समवेत विकृत स्वरूपात छायाचित्रे काढणे म्हणजे धर्मशिक्षणाचा झालेला र्हासच आहे. यावरूनच धर्मशिक्षणाची अपरिहार्यता पुन्हा एकदा अधोरेखित होते. – सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.