पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – हवामान पालटाच्या दुष्परिणामावर संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. गोव्यातही अनियंत्रित विकासामुळे हवामान पालटाचे दुष्परिणाम अधिकच घातक ठरणार आहेत. गोव्यातील किनारपट्टीचा भाग आणि राज्यातील मध्यवर्तीचा भाग यांमध्ये हे दुष्परिणाम दिसतील. पुरामुळे गोव्यातील लागवडीखालील भूमी घटणार असल्याने अन्नधान्यासाठी परराज्यांवर अवलंबून असल्याने गोव्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे मत भूगर्भशास्त्रज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
गोव्यातील जलस्रोत खात्याचे माजी भूगर्भशास्त्रज्ञ एन्. सोमसुंदरम् म्हणाले, ‘‘बार्देश, तिसवाडी आणि सासष्टी या किनारपट्टीला लागून असलेल्या तालुक्यांतील भातशेती आणि खाजन भूमी सखल भागात असल्याने ही लागवडयोग्य भूमी भावी काळात पाण्याखाली जाण्याची भीती आहे. हवामान पालट आणि वर्ष २१०० पर्यंत समुद्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने गोव्यातील पारंपरिक कृषी व्यवसाय धोक्यात येणार आहे.’’
भूगर्भशास्त्रज्ञ मनोज इंब्रामपूरकर म्हणाले, ‘‘पर्वरी परिसर आणि कदंब पठार येथे कृषी लागवडीच्या भूमीचे ‘सेटलमेंट झोन’मध्ये (बांधकामासाठीची भूमी) रूपांतर करण्यात आल्याने भूमीची पाण्याचे शोषण करण्याची क्षमता उणावली आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडल्यास सखल भागात लगेच पाणी साचून रहाते. गोव्यात राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर-दक्षिण दिशेने चालू असलेल्या रूंदीकरणामुळेही पाण्याचा पूर्व ते पश्चिम या दिशेने असलेल्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा पोचल्याने पर्यावरणावर परिणाम झाला आहे. मडगाव येथील ‘वेस्टर्न बायपास’ आणि पैंगीण येथील नवीन बगलमार्ग बांधकाम यांमुळे नजीकच्या शेतात बराच वेळ पाणी साचून रहाते.’’
कृषी खात्याचे संचालक नेव्हील आल्फोन्सो म्हणाले, ‘‘गोव्यात मागील २-३ वर्षांत पूर येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठावरील शेती किंवा बागायती यांची हानी होत आहे.’’ ‘गिरी कोमुनिदाद’चे अध्यक्ष टुलियो डिसोझा म्हणाले, ‘‘हल्लीच म्हापसा येथे झालेली पूरग्रस्त स्थिती अनियंत्रित विकास आणि हवामान पालट यांमुळे उद्भवली.’’ जलस्रोत खात्याने यावर उपाय म्हणून अनेक सूचना शासनाला केल्या आहेत. यामध्ये नदीच्या काठांवरील बंधार्यांची तातडीने दुरुस्ती करणे, नदीच्या काठी खारफुटीच्या लागवडीत वाढ करणे आदींचा समावेश आहे.