मार्च २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि त्यांच्या पत्नी सौ. श्वेता क्लार्क यांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेतील अभिनेता, दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची मुंबईत भेट घेतली. त्या भेटीच्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणावरून त्यांची साधनेविषयी असलेली ओढ श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांच्या लक्षात आली. श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी त्यांना साधनेविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी साधनेचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या भावस्पर्शी भेटीचा वृत्तांत पुढे दिला आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अभिनेते, दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची भेट घेण्याची संधी मिळणे
१ अ. दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ ही मालिका पहात असतांना तिच्यात श्रीकृष्णाची भूमिका करणार्या अभिनेत्यांना पाहून ‘ते सात्त्विक आहेत’, असे जाणवणे आणि प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ न शकणे : ‘मार्च २०२१ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणार्या एका अभिनेत्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी झालेली भेट ही आमच्यासाठी एक मोठी अनुभूतीच आहे. काही दिवसांपूर्वी ‘महाभारत’ ही मालिका पहात असतांना त्यातील श्रीकृष्णाची भूमिका करणार्या अभिनेत्यांना पाहून ‘ते सात्त्विक असून त्यांना ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ आहे’, असे आम्हाला जाणवले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करण्याचा विचार आमच्या मनात आला; मात्र आमच्याकडे त्यांचा संपर्क क्रमांक नव्हता. ‘फेसबूक’च्या माध्यमातून आम्ही या अभिनेत्यांशी संपर्क साधला आणि त्यांना संदेश पाठवला. त्यांना जगभरातून पुष्कळ संदेश येत असल्याने त्यांनी आमचा संदेश पाहिला नाही आणि त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. पुढील ३ मास श्रीकृष्ण सातत्याने आम्हाला साधना करण्याची क्षमता असलेल्या या अभिनेत्यांशी संपर्क साधण्याचा विचार देत होता.’ – श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ आ. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने साधिकेच्या संहितालेखिका असलेल्या मैत्रिणीकडून दिग्दर्शक अन् अभिनेते यांचे संपर्क क्रमांक मिळणे आणि त्या वेळी साधकांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. नंतर आम्ही श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘देवा, तू आम्हाला या अभिनेत्यांशी संपर्क करण्याचे विचार देत आहेस. तूच आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मार्ग दाखव.’ श्रीकृष्णाने मला ‘या मालिकेचे दिग्दर्शक कोण आहेत ? ‘फेसबूक’वरील मित्र-मैत्रिणींकडून त्यांच्याविषयी काही माहिती मिळते का ?’, हे पहाण्याचा विचार दिला. माझे ‘फेसबूक’ खाते पाहिल्यावर माझी महाविद्यालयातील एक मैत्रीण आणि मालिकेचे दिग्दर्शक यांची ओळख असल्याचे मला समजले. या मैत्रिणीने मालिकेचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्याशी मैत्री असल्याचे सांगून मला त्यांचे संपर्क क्रमांक दिले. मी गेली २० वर्षे या मैत्रिणीच्या संपर्कात नव्हते. ‘ती मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करते, या लोकांना ओळखते आणि या मालिकेची संहितालेखिका आहे’, हेही मला ठाऊक नव्हते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर पाठीशी असतांना काहीच अशक्य नाही’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव आम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहेत’, या कृतज्ञतेच्या भावाने माझे आणि श्री. शॉन यांचे अंतःकरण भरून आले.’ – सौ. श्वेता क्लार्क
१ इ. अभिनेते आणि दिग्दर्शक यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केल्यावर ‘दिग्दर्शकांना अध्यात्मात रस असून अभिनेते श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त आहेत’, असे जाणवणे : मार्च २०२१ मध्ये आम्ही अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधल्यावर उभयतांनी आम्हाला भेटण्यात रस दाखवला. भ्रमणभाषद्वारे झालेल्या या प्रथम संपर्कात दिग्दर्शक आमच्याशी १ घंटा आपुलकीने बोलले. त्यांच्या बोलण्यातून त्यांना अध्यात्मात रस असल्याचे आमच्या लक्षात आले. अभिनेत्यांशी बोलल्यावर ते श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त असल्याचे जाणवले. उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्यांना प्रत्यक्ष संपर्क करण्याचे ठरवले. त्यानुसार मुंबईत आम्ही अभिनेते, दिग्दर्शक आणि या दोघांचा परिचय करून देणारी माझी मैत्रीण यांची प्रत्यक्ष भेट घेतली.’ – सौ. श्वेता क्लार्क
२. श्रीकृष्णाप्रती भाव असणारे दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते !
२ अ. अभिनेत्यांचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव ! : आम्हाला प्रथम भेटीतच अभिनेत्यांमध्ये नम्रता जाणवली. आम्ही त्यांच्यासाठी भेट म्हणून सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र नेले होते. त्यांना त्याविषयी सांगितल्यावर त्यांनी ते चित्र पहाण्यात पुष्कळ उत्सुकता दाखवली. या कालावधीत कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वत्र निर्बंध लावलेले असल्याने सर्व उपाहारगृहे बंद होती. आम्ही एका उपाहारगृहाच्या बाहेर बसलो होतो. तेथेही सभोवती लोक ध्रूमपान करत असल्यामुळे धूर पसरला होता. ते पाहून त्यांनी ‘श्रीकृष्णाचे चित्र या धुरात पहायला नको’, असे सांगून आम्हाला स्वतःच्या चारचाकीत बसून बोलण्याविषयी सुचवले. आम्ही त्यांना श्रीकृष्णाचे चित्र भेट म्हणून दिल्यावर त्यांची पुष्कळ भावजागृती झाली.
२ आ. अभिनेत्यांशी झालेले संभाषण : आमच्याशी झालेल्या ३ घंट्यांच्या प्रदीर्घ संभाषणात त्यांची अनेक वेळा भावजागृती होत होती. त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून ‘महाभारत’ या मालिकेत ते साकारत असलेली श्रीकृष्णाची भूमिका आणि त्यांचे जीवनाविषयीचे विचार आमच्या लक्षात आले.
२ आ १. मालिकेच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी ताण आल्याने अभिनेत्यांना अभिनय करता न येणे आणि त्या वेळी त्यांनी श्रीकृष्णाला ‘माझ्याकडून ही भूमिका करवून घे’, अशी प्रार्थना करणे
अभिनेते : या मालिकेचे चित्रीकरण चालू झाल्यावर पहिल्या दिवशी मला पुष्कळ ताण आला होता आणि त्यामुळे मी अभिनय करू शकलो नाही. त्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून ही भूमिका करवून घे. मी कुणीच नाही. या भूमिकेत माझे काहीही नाही. तूच कर्ता-करविता आहेस.’ (‘हे सांगतांना अभिनेत्यांची पुष्कळ भावजागृती झाली होती.’ – श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क)
२ आ २. ‘शाळेत असतांना नाटकात श्रीविष्णूची भूमिका करायची अपूर्ण राहिलेली इच्छा श्रीकृष्णाने या मालिकेच्या रूपाने पूर्ण केली’, असे अभिनेत्यांनी सांगणे
अभिनेते : मी शाळेत असतांना मला शाळेतील एका नाटकात श्रीविष्णूची भूमिका करायची होती; परंतु तेव्हा मुख्याध्यापकांच्या मुलाला ती भूमिका करायची संधी मिळाली. तेव्हापासून माझी अपूर्ण राहिलेली माझी ती इच्छा श्रीकृष्णाने या मालिकेच्या रूपाने पूर्ण केली.
२ आ ३. लोकांनी श्रीकृष्णाच्या भूमिकेचेही व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करणे, अभिनेत्यांना विविध कार्यक्रम आणि मेजवानी यांना बोलावण्यात येणे; पण तेथे आनंद मिळत नसल्याने त्यांनी त्या कार्यक्रमांना जाणे टाळणे
अभिनेते : आजचे मनोरंजनाचे जग अत्यंत व्यावसायिक असल्याने मला त्याविषयी आपलेपणा वाटत नाही. लोकांना श्रीकृष्णाच्या भूमिकेचेही व्यापारीकरण करायचे आहे. ‘मी श्रीकृष्णाचा वेश परिधान करून विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे’, असे इतरांना वाटते; पण ‘श्रीकृष्णाचा वेश अत्यंत पवित्र आहे’, असे मला वाटते. त्यामुळे मी अशा ठिकाणी जाणे टाळतो.
मी दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये अभिनय करत असल्याने मला विविध कार्यक्रम आणि मेजवानी यांना बोलावण्यात येते. मला तेथे नृत्यही करायला सांगतात; पण मला तेथे मुळीच आनंद मिळत नाही आणि पुष्कळ कंटाळा येतो. तेथे उपस्थित अन्य लोक मला एकलकोंडा म्हणतात. मला ते वातावरण मुळीच आवडत नाही. मी शक्य तितके त्या कार्यक्रमांना जाणे टाळतो.
२ आ ४. अभिनेत्यांनी ‘मी श्रीकृष्णाला ‘मला पुढील मार्ग दाखव’, अशी प्रार्थना करत आहे’, असे सांगणे आणि ‘आपली भेट ही श्रीकृष्णाची तुमच्यावरील कृपाच आहे’, असे साधकांनी सांगणे
अभिनेते : गेले काही दिवस मी अत्यंत आर्ततेने श्रीकृष्णाला ‘मला पुढील मार्ग दाखव’, अशी प्रार्थना करत आहे. ‘माझ्या आयुष्यात गुरु कधी येणार आणि मला पुढील मार्गदर्शन कधी मिळणार ?’, असे मला वाटत आहे.
श्री. शॉन क्लार्क / सौ. श्वेता क्लार्क : ‘आपली भेट होणे’, ही सामान्य घटना नाही. ही श्रीकृष्णाची तुमच्यावरील कृपाच आहे. ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ असल्यास गुरु स्वतः आपल्या जीवनात येतात.
२ आ ५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माझा प्रणाम सांगा’, असे अभिनेत्यांनी सांगणे आणि त्यांना गोव्यातील आश्रमात येण्याची इच्छा असणे
अभिनेते : मी लहान असतांना माझ्या आईला ‘माझा जन्म का झाला ? माझ्या जन्माचा उद्देश काय ?’, असे प्रश्न विचारत असे. (त्यांचे बोलणे ऐकून ‘ते दैवी बालक असावेत’, असे आम्हाला वाटले.) मला एस्.एस्.आर्.एफ्. करत असलेल्या अध्यात्माविषयीच्या संशोधनात पुष्कळ रस आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माझा प्रणाम सांगा. मला गोवा येथील तुमच्या आश्रमात येण्याची इच्छा आहे.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507242.html
– श्री. शॉन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)