पुणे, २८ ऑगस्ट – कोरोनाविषयक निर्बंध अल्प केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव यांसह इतर सर्वधर्मियांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्ह्यातील कोरोनासंबंधित उपाययोजनांविषयी २७ ऑगस्ट या दिवशी पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शाळा चालू करण्याच्या दृष्टीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाविषयी विभागीय पातळीवर अहवाल मागवून पुढील निर्णय घेण्यात येईल. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाविषयी स्वतंत्र अहवाल सिद्ध केला जाईल. हा अहवाल विभागीय स्तरावरून राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.