सावंतवाडी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चालू असलेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ हा पूर्वनियोजित दौरा आहे. त्यामुळे राजकीय दबावातून जिल्हा प्रशासनाकडून चालू असलेली दडपशाही योग्य नाही. ही लोकशाही आहे कि तालिबानशाही ? प्रशासनाने दडपशाहीचा कितीही प्रयत्न केला, तरीही ही यात्रा होणारच, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने फ्लेक्सचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक काढण्याच्या सूचना पोलिसांनी ग्रामपंचायत, तसेच पंचायत समिती यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तेली म्हणाले, ‘‘जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. जनआशीर्वाद यात्रेचा दौरा पूर्वनियोजित असतांना, तसेच कोणत्याही प्रकारची निवडणूक आचारसंहिता नसतांना प्रशासनाने नोटीस बजावणे नियमबाह्य आहे.’’