शिरगावमधील खाणमातीमुळे निरुपयोगी झालेली ३० हेक्टर शेतभूमी लागवडीच्या स्थितीला आणली ! – शासनाची उच्च न्यायालयात माहिती

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी – शिरगाव (डिचोली) येथील खाणमातीमुळे लागवडीसाठी निरुपयोगी झालेली ३० हेक्टर शेतभूमी पुन्हा लागवडयोग्य स्थितीला आणली आहे, अशी माहिती शासनाच्या जलस्रोत खात्याने उच्च न्यायालयात दिली. याविषयी शिरगावच्या ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
जलस्रोत खात्याने याविषयी एक अहवालच उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत खाण प्रभावित गावांमध्ये ४ कोटी ४ लाख रुपयांचे पर्यावरण पुनर्वसन काम तेथील खाण आस्थापनांच्या साहाय्याने हाती घेण्यात आले आहे. खाणमातीमुळे लागवडीसाठी निरुपयोगी झालेली शेतभूमी पूर्वस्थितीला आणणे, नद्यांच्या पात्रांमधील गाळ काढणे, शेतभूमीतील झुडपे काढणे आदी कामे पुणे येथील ‘अभिनंदन बिल्डकॉम’ या आस्थापनाने केली असून यासाठी त्यांना आतापर्यंत १ कोटी ६७ लाख रुपये देण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे या कामाला विलंब झाला असून आता मार्च २०२२ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
शिरगाव येथील नदीतील ३.७३ कि.मी. एकूण लांबीपैकी २.५१७ कि.मी. लांबीचे म्हणजेच ६७.४ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. ७० हेक्टर शेतभूमीपैकी ३० हेक्टर शेतभूमीतील खनिज मातीचा गाळ काढण्यात आला असून हे क्षेत्रफळ लागवडयोग्य बनले आहे. उर्वरित ४० हेक्टर शेतभूमी पूर्वस्थितीला आणण्याचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.