केवळ कॅसिनोतील कर्मचार्यांसाठी संपूर्ण राज्याने कोरोनाचे संकट ओढवून घ्यायचे का ? – संपादक
पणजी, २७ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील कॅसिनो लवकरात लवकर चालू करण्याची मागणी कॅसिनोत काम करणार्या कर्मचार्यांनी गोवा शासनाकडे केली आहे. कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करून कॅसिनो चालू करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात संचारबंदी लागू केल्यापासून मागील ८ मास कॅसिनो व्यवसाय बंद आहे. राज्यात ६ तरंगते, तर १२ हून अधिक भूमीवर चालणारे कॅसिनो आहेत.
कॅसिनोचे कर्मचारी याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘कॅसिनो मे मासात चालू होणार होते; मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा कॅसिनो बंद करण्यात आले. शासन संचारबंदी हळूहळू उठवत आहे आणि राज्यातील सर्व व्यवसाय आता पूर्ववत् चालू होत आहेत; मात्र कॅसिनो व्यवसायच बंद का ?
कॅसिनोच्या सर्व कर्मचार्यांनी कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत. कॅसिनो व्यवसायावर राज्यातील सहस्रो कामगार अवलंबून आहेत. कॅसिनोवर टॅक्सी, हॉटेल व्यवसाय आदी अनेक जोडधंदे चालतात. शासनाने किमान निम्म्या क्षमतेने कॅसिनो चालू करण्याची अनुमती द्यावी. अनधिकृत जुगार बंद झाला पाहिजे, तर कॅसिनो चालू झाला पाहिजे.’’