पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७७ कोटी रुपयांची दंड आकारणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या साहाय्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर ३१ जुलैपर्यंत ‘ई-चलना’च्या माध्यमातून तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० सहस्र ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. त्यांपैकी प्रत्यक्षात केवळ १० कोटी ४५ लाख ९८ सहस्र १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेकांना त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आल्याचे संदेश येतात; मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पोलिसांनी कितीही दंड आकारणी केली तरी तो वसूल होण्याचे प्रमाण प्रतिदिन न्यून होत आहे.

‘ई-चलना’मुळे दंड भरण्याचे प्रमाण गेल्या वर्षी २६.३७ टक्के होते. तेच प्रमाण या वर्षी १३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. वाहतूक शाखेच्या येरवडा येथील नियंत्रण कक्षातून त्यावर लक्ष ठेवण्यात येते. यात प्रामुख्याने विनाहेल्मेट, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर तेथील पोलीस कारवाई करतात. त्याची संपूर्ण माहिती संबंधित वाहनमालकाच्या भ्रमणभाषवर पाठवून ‘ई चलना’च्या माध्यमातून दंड आकारला जातो.