अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन !
मेरठ (उत्तरप्रदेश) – अधिवक्ता हा कायदा आणि राज्यघटना यांचे ज्ञान असलेला घटक आहे. सामान्य लोकांना कायदा कळत नाही किंवा ते कधी राज्यघटना वाचत नाहीत. त्यामुळे ‘भारत घटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र झाले पाहिजे’, अशी मागणी हिंदू संघटना करतात, तेव्हा सामान्य लोकांना ते समजणे कठीण जाते. शाळा-महाविद्यालयात नागरिकशास्त्राप्रमाणे कायदा आणि राज्यघटना यांचे शिक्षण न दिले गेल्याने शासकीय-प्रशासकीय यंत्रणा, न्यायपालिका, सामाजिक दुष्प्रवृत्ती आदींकडून अन्याय-अत्याचार होत असेल, तर ‘कायद्याच्या मार्गाने कसे लढायचे’, याविषयी भारतीय जनता अज्ञानी असते. अशा परिस्थितीत अधिवक्त्यांनी जनतेला अन्याय-अत्याचारांच्या विरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त कायदे शिकवणे, तसेच ‘भारत घटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित होण्याची आवश्यकता’ या विषयावर प्रबोधन करणे , असे योगदान द्यायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्ता परिषदेच्या मेरठ शाखेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत केले.
बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले. बैठकीच्या शेवटी अधिवक्ता परिषदेच्या मेरठ शाखेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कुमार त्यागी यांनी आभार व्यक्त केले. मेरठ येथील माजी नगरसेवक आणि देहली येथील सांस्कृतिक गौरव संस्थानचे कार्यालयमंत्री श्री. संजीव पुंडीर आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम उत्तरप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके हेही या बैठकीला उपस्थित होते.