मूर्तीकार संघटनेची उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !
नागपूर – ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाच्या विरोधात ‘पीओपी मूर्तीकार संघा’ने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून आव्हान दिले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल. ‘पीओपी मूर्तीकार संघा’चे अध्यक्ष विनोदकुमार गुप्ता यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विक्री करण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींपैकी ९०-९५ टक्के मूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या असतात. कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी आणि दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी विदर्भातील मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा साठा करून ठेवला होता; पण देशात कोरोनामुळे दळणवळण बंदी घोषित झाली आणि उत्सवांवर निर्बंध आले. त्यामुळे मूर्तीकारांच्या लाखो रुपयांच्या मूर्ती तशाच पडून आहेत.
विदर्भातील जवळपास १० सहस्र मूर्तीकार ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे या मूर्तींचा साठा असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० या दिवशी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विक्रीवर बंदी घातली होती. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेले मूर्तीकार पुन्हा संकटात सापडले आहेत. यासाठी मूर्तीकारांना त्यांच्याकडे असलेला मूर्तींचा साठा विक्री होईपर्यंत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विकण्याची अनुमती सरकारने द्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते गुप्ता यांनी याचिकेत केली आहे.