भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे ! – जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांचे मत

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन्

नवी देहली – भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे. या टप्प्यावर अल्प किंवा मध्यम पातळीवर रोगाचा प्रसार चालू रहातो. लोक जेव्हा विषाणूशी जुळवून घेतात, त्या वेळी हा टप्पा येतो. साथीच्या टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा असतो. साथीच्या टप्प्यात विषाणू लोकसंख्येला बाधित करतो, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांनी मांडले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होत्या.

१. स्वामीनाथन् म्हणाल्या की, भारताचा आकार आणि लोकसंख्येतील विविधता अन् विविध भागांत असलेली रोगप्रतिकारशक्ती यांमुळे देशातील कोरोनाची स्थिती अशीच वर-खाली रहाण्याची पुष्कळ शक्यता आहे. संसर्ग अल्प किंवा मध्यम पातळीवर रहाण्याच्या टप्प्यात आपण प्रवेश करत असू, असे वाटते. या स्थितीत रुग्णवाढीचा वेग आणि सर्वोच्च लागणबिंदू दिसत नाही, जो काही मासांपूर्वी होता. ज्या भागात किंवा गटांना पूर्वी पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लागण झालेली नाही किंवा ज्या भागात फारसे लसीकरण झालेले नाही, अशा ठिकाणी रुग्णवाढीत उच्चांक दिसेल आणि ही स्थिती पुढील अनेक मास राहील.’

२. मुलांना कोरोनाची बाधा होण्याच्या शक्यतेवर स्वामीनाथन् म्हणाल्या की, अन्य देशांत झालेल्या सर्वेक्षणातून मुलांना लागण होण्याची आणि प्रसाराची शक्यता आहे; पण त्याचे स्वरूप सौम्य राहील अन् अत्यंत किरकोळ प्रमाणात मुले आजारी पडतील. प्रौढांच्या तुलनेत हे प्रमाण पुष्कळच अल्प असेल; पण तरीही या समस्येशी लढण्याची पूर्वसिद्धता करणे चांगले ! मुलांसाठी रुग्णालये सिद्ध करणे, अतीदक्षता विभाग उभारणे महत्त्वाचे आहे. अतीदक्षता विभागात सहस्रो मुलांची गर्दी झाली, तरी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.’