सीतामढी (बिहार) येथे नर्सिंग होममध्ये झालेल्या अज्ञातांच्या गोळीबारात परिचारिका ठार, तर डॉक्टर घायाळ !

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे रुग्णालयावर असे आक्रमण होणे अपेक्षित नाही. तेथील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलणार ? – संपादक

सीतामढी (बिहार) – येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये (आरोग्यसेवा पुरवणार्‍या केंद्रामध्ये) अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एक परिचारिका ठार झाली, तर एक डॉक्टर गंभीररित्या घायाळ झाले. डॉ शिवशंकर महतो, त्यांची पत्नी, २ कर्मचारी आणि १ परिचारिका येथील नर्सिंग होममध्ये पोचल्यानंतर ही घटना घडली. या घटनेत डॉ. महतो यांना ३ गोळ्या, तर परिचारिका बबली पांडे यांना ५ गोळ्या लागल्या. यात बबली पांडे यांचा मृत्यू झाला. डॉ. महतो यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे आक्रमण भूमीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.