चेन्नई – ‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा प्रत्येक आठवड्याला २०० मुलांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. रामकुमार यांनी ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रित केले होते.
हा कार्यक्रम १ मे ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये प्रत्येक रविवारी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आयोजकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सनातन संस्थेला ‘विज्ञान आणि परंपरा’ या विभागाच्या अंतर्गत विषय मांडण्यासाठी १० मिनिटे वेळ देण्यात आला होता. या १३ आठवड्यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘सण-उत्सव, श्री गणेश, श्रीकृष्णाष्टमी, कुंकू का लावावे ? नमस्कार कसा करावा ? सात्त्विक कपडे परिधान करण्यामागील शास्त्र, वाढदिवस कसा साजरा करावा ? प्रार्थना कशी करावी ? नामजप, गुरुपौर्णिमा, स्वभावदोष आणि गुण’, अशा विविध विषयांवर शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार आणि श्रीमती कलाईवानी यांनी सहभाग घेतला.
अभिप्राय
१. या सत्संगांमधून आमच्या मुलांना ‘टिळा का आणि कसा लावावा? हिंदु परंपरेनुसार वाढदिवस कसा साजरा करावा ? नमस्काराच्या योग्य पद्धती’, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे पालकांनी सांगितले.
२. काही जिज्ञासू पालकांनी सनातन संस्थेशी संपर्क साधून सनातनने प्रकाशित केलेल्या स्वभावदोष निर्मूलनाविषयीच्या ग्रंथांची खरेदी केली, तसेच काही जण सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये सहभागी होऊ लागले आहेत.
३. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०११ मध्ये आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला श्री. रामकुमार उपस्थित होते. तेव्हापासून त्यांचा सनातन संस्थेशी परिचय आहे.