कराड, २२ ऑगस्ट (वार्ता.) – स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिकेचा देशात सलग २ वर्षे प्रथम क्रमांक आला. तत्पूर्वीच्या स्पर्धेत २५ वा क्रमांक आला होता. या तिन्ही वर्षांत कराड पालिकेला २० कोटी रुपये बक्षीस स्वरूपात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार १० कोटी रुपये पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरित १० कोटी रुपयांचा निधी २ वर्षे होऊनही कराड नगरपालिकेला शासनाकडून येणे शेष आहे.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वर्ष २०१८ मध्ये २५ वा क्रमांक पटकावला. तेव्हा ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. पुढे वर्ष २०१९ मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला, तेव्हा १५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. दोन्ही बक्षिसांच्या रकमेपैकी १० कोटी रुपये अनुदान पालिकेस प्राप्त झाले; मात्र उर्वरित १० कोटी रुपये प्रलंबित आहेत. पालिका प्रशासन हा निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र कोरोनामुळे शासनाकडे देण्यासाठी निधी नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच निधीअभावी स्वच्छ सर्वेक्षणाची कामे करतांनाही विविध अडचणी येत आहेत.