२० वर्षांत जे काही उभारले होते, ते सर्व संपले ! – अफगाणी खासदार नरेंदर सिंह खालसा

नवी देहली – अफगाणिस्तानमधून भारतीय वायूदलाच्या विमानाद्वारे भारतीय आणि अफगाणी लोकांना भारतात आणले जात आहे. यांतील अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंदर सिंह खालसा यांना भारतात आल्यावर अश्रू अनावर झाले. ‘गेल्या २० वर्षांत जे काही उभे केले होते, ते सर्व संपले’, असे खासदार नरेंदर सिंह खालसा म्हणाले.

१. अफगाणिस्तानात हिंदू आणि शीख बांधव चिंतेत आहेत. जेवढेही भारतीय आहेत, त्या सर्वांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी विनंती खासदार खालसा यांनी भारत सरकारला केली आहे.

२. खालसा म्हणाले की, काबुल विमानतळाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर ५ – ६ सहस्र नागरिक उभे आहेत. त्यात तालिबानीही घुसले आहेत. यामुळे आतंकवादी कोण आणि नागरिक कोण, हेच कळत नाही.

३. मला आता सुरक्षित वाटत आहे. माझी पत्नी भारतीय आहे. आम्हाला सुरक्षित बाहेर काढल्यामुळे आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत, असे एका अफगाण नागरिकाने सांगितले.

४. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. विमानतळावर आम्हाला २४ घंटे वाट बघावी लागली, असे वजूद शहजाद या अफगाण नागरिकाने सांगितले.

५. आमचे सहकारी अफगाणिस्तानमधील गुरुद्वारामध्ये अडकले आहेत. तिथे अडकलेल्या २८० जणांनाही मायदेशात आणावे, अशी आमची भारत सरकारला विनंती आहे, असे मनजित सिंह नावाच्या एका शीख व्यक्तीने सांगितले.