शिक्षणपद्धत निश्चित करतांना मनुष्याच्या जीवनाशी संबंधित ध्येयाचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक !

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आधुनिकतेने ग्रासलेल्या युवकांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करू न शकणे, ज्ञान आणि त्याचे ४ प्रकार अन् ज्ञान आणि ज्ञानाची साधने यांविषयी पूर्णतेचा अभाव’, यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.                          

(भाग ७)

पू. डॉ. शिवकुमार ओझा

११. शिक्षणपद्धत निर्धारित करण्यात व्यापक दृष्टीकोनांचा अभाव असल्याने मनुष्य अज्ञानी रहाणे

‘प्रचलित आधुनिक शिक्षणपद्धत संकुचित असून तिच्यात व्यापक दृष्टीकोन नाही. आधुनिक शिक्षणात केवळ मनुष्याच्या नैसर्गिक आवश्यकतांकडेच लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्या पूर्ततेचे ध्येय समोर ठेवून त्यानुरूप आधुनिक शिक्षणपद्धत कार्यवाहीत आणली गेली आहे. शिक्षणपद्धतीत व्यापक दृष्टीकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापक दृष्टीकोनाच्या अभावामुळे मनुष्य आपल्या जीवनाशी संबंधित पुष्कळशा गोष्टींच्या संदर्भात अज्ञानी रहातो आणि अन्य अत्यंत महत्त्वपूर्ण आवश्यकतांवर प्रयत्न होऊ शकत नाहीत, उदा. वासना (राग, द्वेष, ईर्षा, लोभ इत्यादी) नष्ट होणे, चारित्र्य निर्मिती, आंतरिक शक्तींची (सिद्धींची) जागृती, मनुष्य जीवनाच्या ध्येयांचा यथार्थ रूपात निश्चय, जीवनाशी संबंधित अनेक गूढ समस्यांचे निराकरण इत्यादी. ‘शिक्षणपद्धत निश्चित करण्यामध्ये व्यापक दृष्टीकोन आवश्यक असणे’, हा एक महत्त्वपूर्ण विचार आहे.

१२. आधुनिक शिक्षणपद्धतीत सुधारणा करण्यात अयशस्वी ठरणे 

१२ अ. भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया इंग्रजांच्या शिक्षणासंबंधीच्या धोरणांवर आधारित असणे : भारतात प्रचलित आधुनिक शिक्षणपद्धतीतील दोष आणि त्यांचे परिणाम सर्वजण जाणतात. भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया इंग्रजांच्या शिक्षणासंबंधीच्या धोरणांवर आधारित आहे. विद्यार्थी आणि नवयुवक पाश्चिमात्य सभ्यतेचे प्रशंसक व्हावेत अन् त्यांना (इंग्रजांना) शासन चालवण्यात अन् शासनकाळ वाढवण्यात सुलभता व्हावी, अशा स्वरूपाचे शिक्षण (इंग्रजाळलेले) होते.

१२ आ. आंतरिक स्वरूपात परिवर्तन करण्याचे धाडस नसल्याने आधुनिक शिक्षण विविध दोषांनी युक्तच असणे : आधुनिक शिक्षणासंबंधीच्या तरतुदी आणि धोरणे यांमध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर (सरकारच्या हस्तांतरणाचा करार) वेळोवेळी आयोगांची स्थापना झाली आणि शिफारसी करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षणाचे बाह्यरूप काही प्रमाणात पालटले आहे; परंतु त्याच्या आंतरिक स्वरूपात परिवर्तन करण्याचे धाडस करण्यात आले नाही. त्यामुळे आधुनिक शिक्षणही आज विविध दोषांनी युक्त आहे.

१२ इ. आधुनिक शिक्षणात सुधारणा होण्यासाठी केलेले विविध उपाय अयशस्वी ठरणे

१. शैक्षणिक केंद्रांमध्ये प्रतिदिन काही वेळा आरंभी प्रार्थना करणे

२. अन्य देशांच्या शिक्षणपद्धतीचे अनुकरण करण्याचा विचार करणे

३. समस्या (मुळापासून न सोडवता) मधूनच सोडवणे

४. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांसाठी कठोर दंडाची तरतूद असणे

५. समस्या सोडवण्यासाठी बौद्धिक विचार प्रस्तुत करणे, उदा. आर्थिक समानता.

प्रत्यक्षात या उपायांनी कोणताही उल्लेखनीय लाभ झाला नाही.

१३. पाश्चिमात्य शिक्षणात भारतीय संस्कृतीच्या विचारसरणीप्रती भारतियांना अनभिज्ञ ठेवले जाणे आणि भारतीय संस्कृतीत विद्यार्थी तपोमय जीवन जगून ते मानवीय मूल्यांचे रक्षण करण्यात सक्षम होऊ शकणे

पाश्चिमात्य शिक्षण प्राप्त बुद्धीजीवी आणि शिक्षणतज्ञ यांनाही असे वाटते की, विद्यार्थ्यांना मानवीय मूल्यांचे (Human Values) शिक्षण विद्यालयांमधून द्यायला हवे. त्यामुळे विद्यार्थी सदाचरण करतील; परंतु केवळ मानवीय मूल्ये शिकवण्यामुळे विद्यार्थी सदाचरणी होऊ शकतील का ? सर्व विद्यार्थी मानवीय मूल्यांशी (उदा. खरे बोलणे, छळ-कपट न करणे (फसवणूक न करणे), हिंसा न करणे इत्यादी) आधीपासूनच परिचित आहेत. मानवीय मूल्ये जाणत असूनही ती आचरणात का आणता येऊ शकत नाहीत ? या विषयावर भारतीय संस्कृतीमध्ये संशोधन झाले असून सदाचरणाप्रती दृढप्रतिज्ञ, प्रवृत्त आणि अनासक्त होण्याचे विविध व्यावहारिक उपाय सांगितले गेले आहेत. आधुनिक शिक्षणात भारतीय संस्कृतीच्या विचारसरणीप्रती आपल्याला अनभिज्ञ ठेवले जाते, हे भारतियांचे दुर्भाग्य आहे. मानवीय मूल्यांचे पालन आणि त्यांचे रक्षण करण्यात मनुष्याला विविध प्रकारचे खडतर प्रयत्न करावे लागतात. हे भोगवादी आधुनिक विद्यार्थी किंवा युवक यांना शक्य होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विद्यार्थ्यांना तपोमय जीवन जगावे लागते. त्यामुळे मानवीय मूल्यांचे पालन आणि त्यांचे रक्षण करण्यात ते सक्षम होऊ शकतात.

१४. भारतीय संस्कृतीद्वारे ठरवलेले शिक्षण समजून घेण्याचा प्रयत्न झाल्यासच आधुनिक शिक्षणाच्या चक्रातून बाहेर पडता येणार असणे

शिक्षणाच्या स्वरूपात सुधारणा का होऊ शकली नाही ? याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आधुनिक समाज, शासक वर्ग, शिक्षणाचे कर्णधार, शिक्षणतज्ञ इत्यादी सर्वांना आधुनिक शिक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते सर्व आधुनिक शिक्षणाच्या परिणामांनी ग्रासलेले आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाही. अनेक जण आधुनिक भोगवादी संस्कृतीमध्ये आनंदी राहून आपल्या तर्क-वितर्कांनाच आपली बुद्धीमत्ता समजून अहंकाराचे पोषण करत रहातात. जेव्हा भारतीय संस्कृतीद्वारे ठरवलेले शिक्षण समजून घेण्याचा प्रयत्न होईल, तेव्हाच त्यांना या चक्रातून बाहेर पडता येईल. अंतःकरण शुद्ध करण्याचे उपाय आपल्या जीवनात आत्मसात् करता येतील. त्यानंतरच आधुनिक शिक्षणाच्या स्वरूपात सुधारणा होऊ शकते.

१५. भारतीय संस्कृती समजून घेऊन तिचे पालन केल्यास शिक्षणाच्या आधुनिकीकरणातून बाहेर पडता येईल !

शिक्षणपद्धतीत दोष असणे ही एक बाजू झाली. यापेक्षाही अधिक गंभीर गोष्ट म्हणजे आधुनिक जीवनाच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. शिक्षणात सुधारणेचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. सर्व बुद्धीजीवी चिंतीत आहेत; परंतु समाधानकारक उपाय शोधण्यातही ते असमर्थ आहेत. ही भयावह स्थिती आहे. भारतीय संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि शिक्षण अन् जीवन यांच्याविषयी त्या संस्कृतीद्वारे सांगितलेल्या मार्गावर श्रद्धा ठेवून तिचे पालन केल्यास या स्थितीतून बाहेर पडता येईल.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)