महामार्गावरील खड्डे बुजवेपर्यंत पथकरनाका बंद करा ! – सातारावासियांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून खड्डे बुजवण्यामध्ये पुढाकार का घेत नाही ? – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, २१ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकवेळा चेतावणी, निवेदने देऊनही पथकरनाका प्रशासन महामार्गावरील खड्डे बुजवत नाही; मात्र पथकरामध्ये वेळोवेळी वृद्धी करत आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत पथकरनाके बंद करण्यात यावेत, अशी मागणी सातारावासियांकडून केली जात आहे.

पथकरनाका बंद करण्याविषयी सातारावासीय एकत्र येत आहेत. मध्यंतरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारावासियांचे नेतृत्व करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते; मात्र यावर पुढे काहीच झाले नाही. महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, तसेच सातारावासियांसाठी जिल्ह्याच्या सीमेतील तासवडे आणि आनेवाडी पथकरनाके पथकरमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी सातारावासीय करत आहेत. सातारावासियांच्या या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत आहेत.