‘उद्या श्रावण पौर्णिमा, म्हणजेच नारळी पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक (पू. (सौ.) माई)) यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधिका श्रीमती कांचन चव्हाण यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या चरणी ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. नारळी पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र ! पू. माई पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि शीतल छाया देणार्या आहेत.
२. पू. (सौ.) माई यांची प्रीती !
अ. त्यांची प्रीती कुणी बहिणीच्या रूपात, कुणी आईच्या रूपात, तर कुणी मार्गदर्शकाच्या रूपात अनुभवली आहे. त्यांची सर्वांवर एकसारखीच प्रीती आहे.
आ. साधक किंवा कुणीही व्यक्ती दुपारी किंवा कधीही पानवळ-बांदा येथील त्यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात आली, तर पू. माई त्यांना उपाशी जाऊ देत नाही. त्या त्यांना जेवायला किंवा खायला घालूनच पाठवतात. पू. माई दुपारी सर्वांचे जेवण झाल्याविना स्वतः जेवत नाहीत. तेव्हा त्यांना जेवायला कितीही उशीर झाला, तरी चालतो.
३. पू. माईंना काहीही करायचे असेल किंवा काही महत्त्वाचे असेल, तर त्या प.पू. दास महाराज यांना त्याविषयी विचारतात.
४. पू. माई संत असून कधीही मोठेपणा घेत नाहीत. त्या म्हणतात, ‘‘हे सर्व गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) केले. माझे यात काहीही नाही.’’ त्या सर्व कर्तेपण गुरुदेवांना अर्पण करतात.
५. पू. माईंची परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री गजानन महाराज यांच्यावर दृढ श्रद्धा आहे.
‘गुरुदेवांनी आम्हाला पू. माईंचा सहवास दिला’, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– श्रीमती कांचन चव्हाण, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१७.८.२०२१)