७.९.२०२० या दिवशी राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
श्रीमती अनिता आनंद पाटणकर (पत्नी – आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. साधिकेच्या यजमानांना त्यांच्या मृत्यूपूर्वी झालेले त्रास
‘माझ्या यजमानांना मृत्यूच्या आधी दोन मासांपासून पुष्कळ दम लागत होता. कोरोनामुळे दळणवळण बंदी घोषित केलेली असल्यामुळे त्यांना रत्नागिरीला रुग्णालयात नेता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना लघवीला साफ होत नव्हते. त्यांचा आहारही न्यून झाला होता.
२. साधिकेच्या यजमानांचे निधन
२ अ. साधिकेच्या यजमानांचे दुपारी झोपेत शांतपणे निधन होणे : ७.९.२०२० या दिवशी त्यांचे झोपेत निधन झाले. त्या दिवशी आम्हाला कुठलाच नकारात्मक संकेत मिळाला नाही. सर्व सेवा नेहमीप्रमाणे चालू होत्या. यजमानही व्यवस्थित होते. दुपारी झोपण्यापूर्वी ते मुलगा आणि मुलगी यांच्याशी बोलले. त्यानंतर ‘ते झोपेत कधी गेले ?’, हे आम्हाला समजले नाही. दुपारी ३ वाजता मी त्यांना चहा घेण्यासाठी उठवायला गेले. तेव्हा सगळे संपले होते. मी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना प्रार्थना करून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. आधुनिक वैद्यांनी एक घंट्यापूर्वी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
२ आ. साधिकेच्या यजमानांनी प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा स्वतःच्या छातीवर ठेवल्याने अंतसमयी त्यांना त्रास न होणे : त्यांनी मृत्यूच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा त्यांच्या छातीवरच ठेवली होती. त्यामुळे अंतसमयी त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. ‘प.पू. बाबांनी त्यांना या आजारातून तीन वेळा वाचवले होते आणि शेवटी मृत्यूच्या वेळीही सांभाळले’, असे मला जाणवले.
३. साधिकेला तिच्या यजमानांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
अ. यजमानांच्या तोंडवळ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. ‘ते शांत झोपले आहेत’, असे वाटत होते. घरातही पुष्कळ शांत वाटत होते.
आ. ‘यजमान आता या जगात नाहीत’, याची मला जाणीवही झाली नाही. मुलांना पाहिल्यावर मला थोडे रडू आले. नंतर आम्ही शांत झालो.
इ. ‘घरात कुणी गेले आहे’, असे वाटत नव्हते.
ई. यजमानांचे पार्थिव नेण्यापूर्वी ‘स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे’ इत्यादी करतांना मला काही वाटत नव्हते. एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे माझ्या सर्व हालचाली होत होत्या. हे सर्व शांतपणे करण्याची शक्ती मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मिळाली.
उ. त्यांचे १३ व्या दिवसापर्यंतचे विधी शांतपणे पार पडले.
ऊ. गुरुदेवांच्या कृपेमुळे नातेवाइकांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले.
ए. यजमान गेल्यानंतर दुसर्या दिवसापासून मी प्रतिदिन २ – ३ घंटे नामजप लिहिते. मला नामजप ऐकू येतो.
ऐ. हे सर्व होत असतांना ‘माझ्या गुरुदेवांनी मला माझ्या आईप्रमाणे सांभाळले. माझी परात्पर गुरुमाऊली थोर आहे’, एवढी एकच जाणीव मला होत असते आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होते.
४. साधिकेच्या यजमानांना अनेक व्याधी असल्याने ‘देवाने त्यांना लवकर मुक्त केले’, असे तिला वाटणे आणि ‘त्यांना सद्गती मिळावी’, यासाठी देवाला प्रार्थना करणे
यजमानांना मूत्रपिंड, हृदय, ‘थॉयरॉईड’, हर्निया (हर्निया म्हणजे अंतर्गळ – अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल झाल्याने अवयव गळणे) आणि युरिक ॲसिड, यांसंदर्भातील सगळे त्रास होते. ‘या सर्व त्रासांतून देवाने त्यांना लवकर मुक्त केले’, असा विचार करून मी माझ्या मनाची समजूत काढते. ‘देवाने त्यांना सद्गती द्यावी आणि मुलाला कुटुंब सांभाळायला शक्ती द्यावी’, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते.’ (११.९.२०२०)
श्री. अविनाश पाटणकर (मुलगा), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. साधकाला त्याच्या वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘बाबा नेहमी निर्भीडपणे बोलायचे. ते पहिल्यापासून हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे होते.
आ. त्यांनी सुवर्णकाराचा व्यवसाय सचोटीने केला.
इ. राजकारणात असूनही आणि नगरसेवक अन् नगराध्यक्ष या पदांवर राहून सेवा करतांनाही ते पारदर्शकतेने वागले. त्यांनी ‘राजापूर शिक्षण प्रसारक मंडळा’चे विश्वस्त म्हणून काम पाहिले.
ई. बाबांची गुरुदेवांवर फार श्रद्धा होती. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी ते धन आणि धान्य यांच्या रूपांत अर्पण गोळा करत.
उ. त्यांनी मला सेवा करायला बाहेरगावी जाण्यास कधीही अडवले नाही. त्यांच्यामुळे मला सेवा करता येत होती.
‘मला असे वडील लाभले’, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्याविषयी माझ्याकडून जाणते-अजाणतेपणी एखादी चूक घडली असेल, तर मी ईश्वरचरणी क्षमा मागतो.
२. साधकाला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
अ. बाबांच्या मृत्यूनंतर त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता.
आ. गुरुदेवांमुळेच मला स्थिर राहून सर्व अंत्यविधी करता आले. विधी करतांना ‘मी सेवाच करत आहे’, असे मला वाटत होते.
इ. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवला. मी बाबांना अत्तर लावले आणि त्यांच्या मुखात गंगाजल घातले. (चार दिवसांपूर्वीच माझ्या मित्राने मला गंगाजल आणून दिले होते.)
३. अनुभूती – अंत्यविधीच्या कालावधीत पावसाचा अडथळा न येणे
बाबांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी पुष्कळ पाऊस पडत होता; पण त्यांच्या मृत्यूच्या दिवशी अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत पाऊस पडला नाही, तसेच पुढील सर्व दिवसांचे विधी पूर्ण होईपर्यंत पावसाचा अडथळा आला नाही.
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला वरील लिखाण करता आले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘बाबांना सद्गती मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ (११.९.२०२०)
श्री. राजीव आणि सौ. श्वेता सिनकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘पाटणकरकाकांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी वातावरणात मुळीच दाब जाणवत नव्हता.
२. घरात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत चालू असल्यामुळे वातावरण हलके वाटत होते.’ (११.९.२०२०)
श्री. सुभाष पवार, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
‘काकांच्या निधनानंतर त्यांचा तोंडवळा शांत वाटत होता. त्यांच्या घरातही शांत वाटत होते.’ (११.९.२०२०)
श्री. संजय माने, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘काकांच्या निधनानंतर ‘त्यांच्या घरात दुःखद घटना घडली आहे’, असे वाटत नव्हते. ‘त्यांच्या घरात काही तरी सोहळा चालू आहे’, असे वाटत होते.
२. काकांचा तोंडवळा प्रसन्न आणि निर्विकार वाटत होता.’ (११.९.२०२०)
सौ. हेमांगी खानविलकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘पाटणकरकाका गेल्यानंतर त्यांच्या घरी मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.
२. ‘तेथे कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे न वाटता घरात चैतन्यच जाणवत होते.’ (११.९.२०२०) ———
(कै.) आनंद पाटणकर यांच्या निधनानंतर स्थिर असणार्या त्यांच्या कुटुंबियांविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे !
श्री. संजय माने, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘पाटणकरकाकांच्या निधनानंतर काकू (श्रीमती अनिता आनंद पाटणकर) स्थिर होत्या. ‘त्या ईश्वरी अनुसंधानात राहून नामजप करत आहेत’, असे जाणवले.
२. त्यानंतर दोन दिवसांनी काकांचा मुलगा श्री. अविनाश यांचा मला भ्रमणभाष आला. त्यांनी मला विचारले, ‘‘मी राजापूर बाजारपेठेत प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरण करण्याची सेवा करू शकतो का ?’’ अशा परिस्थितीतसुद्धा त्यांची सेवा करण्याची तळमळ पाहून मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ (११.९.२०२०)
सौ. अनामिका अविनाश देवरुखकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘आम्ही पाटणकरकाकांच्या अंतिम दर्शनाला गेलो होतो. तेव्हा घरातील सर्व जण स्थिर होते. ‘काकूंनी स्वतःच्या पतीचा मृत्यू ईश्वरी कृपेमुळे स्थिर राहून स्वीकारला’, असे मला जाणवले. ‘त्या साधना करत असल्यानेच या प्रसंगात स्थिर राहू शकल्या’, असे मला वाटले.
२. अविनाशदादासुद्धा स्थिर राहून काकांच्या पार्थिवावर उपाय (अत्तर लावणे, गंगाजल पाजणे इत्यादी) करत होता.’ (११.९.२०२०)
सौ. माधवी खानविलकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘पाटणकरकाका गेल्यानंतर ४ दिवसांनी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा काकू शांत आणि स्थिर होत्या.
२. त्या साधनेविषयीच बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्या गुरूंनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) माझे मन स्थिर ठेवले. त्यांनीच माझी काळजी घेतली. ‘ते (यजमान) गेले आहेत’, असे गुरूंनी मला जाणवू दिले नाही. गुरुदेव याही स्थितीत प्रतिदिन माझ्याकडून नामजप लिहून घेत आहेत. त्यांनी मला नामातच ठेवले आहे.’’(११.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |