‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

  • जगातील ४० हून अधिक हिंदुद्वेषी विद्यापिठांचा पाठिंबा  

  • हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांचा सहभाग

अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून हिंदुविरोधी गरळओक केली जाते. ती रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून याचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक ! – संपादक

मुंबई – ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. जगातील ४० हून अधिक हिंदुद्वेष्ट्या विद्यापिठांनी ही परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये अमेरिकेतील प्रिन्सटन, स्टॅनफोर्ड, सिएटल, बोस्टन आदी विद्यापिठांचा समावेश आहे. (गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर हिंदुत्वाच्या विचारांकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षिले जात आहेत. त्याला आव्हान देण्यासाठीच हिंदुद्वेष्ट्यांकडून अशा परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. विदेशातील हे वैचारिक आक्रमण केवळ हिंदु धर्मावर नसून ते भारताच्या विरोधातही आहे. त्यामुळे अशा विद्यापिठांना भारत सरकार वेळीच आवर घालेल, अशी अपेक्षा आहे ! – संपादक) १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या काळात होणार्‍या या ‘ऑनलाईन’ परिषदेसाठी आनंद पटवर्धन, आयेशा किडवई, बानू सुब्रह्मण्यम्, भंवर मेघवंशी, क्रिस्टॉफ जॅफरेलेट, कविता कृष्णन्, मीना कंदासामी, महंमद जुनैद, नंदिनी सुंदर, नेहा दीक्षित, रितिका खेरा अशा हिंदुद्वेष्ट्यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

ही परिषद प्रतिदिन सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत चालणार आहे. ३ दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये ‘जागतिक हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाचे राजकीय धोरण’, ‘राष्ट्राची रूपरेषा’, ‘हिंदुत्वाचा देखावा आणि आरोग्य सेवा’ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.