खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

१७.८.२०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात केलेली ‘प्रसाद भांडार’ची निर्मिती’ आणि ‘विदेशातील साधकांना आवडीचे पदार्थ उपलब्ध करून देण्याची गुरुमाऊलीची धडपड’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/503605.html


३. सतत साधकांचा विचार करणारी कृपाळू गुरुमाऊली !

परात्पर गुरु डॉ. आठवले

३ अ. घरदार सोडून त्याग करून आश्रमात येऊन राहिलेल्या साधकांसाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवण्यास सांगणे, तसेच दिवाळीत जे साधक घरी जात नाहीत, त्यांच्यासाठी पदार्थांचे वेगळे नियोजन करून घेणे : रामनाथी येथे आश्रम चालू झाला, तेव्हा अनेक साधक घरदार त्यागून आश्रमात रहायला आले. परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या खाण्यापिण्याकडे पूर्ण लक्ष द्यायचे. त्यांनी मला ‘सर्व साधकांना आवडते, तर आठवड्यातून दोन वेळा ‘पावभाजी’ करा’, असे सुचवले होते, तसेच जे साधक दिवाळीला घरी जात नव्हते, ‘त्यांना काय खावेसे वाटते ?’, याची माहिती घेऊन ते पदार्थ बनवण्याचे वेळापत्रक करायला सांगितले आणि तसे आमच्याकडून करून घेतले.

३ आ. भेटवस्तू म्हणून कापड देतांना शिवणासाठीचे पैसेही पाकिटात घालून द्यायला सांगणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्णवेळ साधकांवर असलेली त्यांची आत्यंतिक प्रीती ! पूर्णवेळ साधकांना प्रसंगानुरूप भेटवस्तू द्यायची झाल्यास केवळ कापड न देता त्याचे शिवणासाठीचे पैसेही ते पाकिटात घालून द्यायला सांगतात.

सौ. मंगला मराठे

३ इ. एकाच वेळी दोन साधिकांचा वाढदिवस करायचा असतांना घरून विरोध असल्याने नातेवाइकांचा आधार नसलेल्या आश्रमातील साधिकेला उंची आणि चांगली भेटवस्तू देण्यास सांगणे : एका साधिकेला साधनेसाठी घरून विरोध होता. तिचा आणि अन्य एका सधन परिवारातील साधिकेचा वाढदिवस एकाच दिवशी होता. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अशा प्रसंगात कसा निर्णय घ्यायचा ?’, हे मला शिकवले. मला वाटले होते, ‘दोघींना समान भेटवस्तू द्यावी; कारण वाढदिवस एकत्र साजरा होणार आहे.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी मला समजावले, ‘‘घरून विरोध असलेल्या साधिकेला कुणाचाच आधार नाही. याउलट दुसरी साधिका आई-वडिलांची लाडकी आहे. ते तिचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतात; म्हणून पहिल्या साधिकेला उंची आणि चांगली भेटवस्तू देऊया.’’

३ ई. परात्पर गुरु डॉक्टर एका साधकाच्या घरी गेले असता त्यांनी तिथे काही न खाता ‘आश्रमात जाऊन खातो’, असे सांगणे आणि आश्रमात आल्यावर गुरुदेवांनी तो खाऊ सर्व साधकांना देणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर एका साधकाच्या घरी गेले होते. तिथे त्या साधकाच्या सुगरण पत्नीने पुष्कळ पदार्थ बनवले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी तिथे केवळ सरबत घेतले आणि ‘‘आश्रमात जाऊन खातो’’, असे म्हणाले. त्यामुळे त्या दांपत्याने डब्यांमधून भरपूर खाऊ दिला. आश्रमात आल्यावर गुरुदेवांनी तो समवेत असलेल्या साधकांना वाटला. ते म्हणाले, ‘‘मी तिथेच खाल्ले असते, तर एकट्याने एवढेसेच खाल्ले असते. इथे आणल्यामुळे सर्व साधकांना पदार्थ देता आले.’’ साधकांनी तो खाऊ खाल्ला, याचा गुरुमाऊलीला केवढा आनंद झाला !

४. खाऊच्या माध्यमातून साधकांचे कौतुक करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

४ अ. बालसाधकाचे कौतुक करतांना त्याला आवडता खाऊ आणि भेटवस्तू देणे अन् पालकांना त्याच्याविषयी लिखाण करायला सांगणे : एखाद्या प्रसंगात बालसाधकाचे कौतुक करायचे असल्यास परात्पर गुरु डॉक्टर त्याच्या पालकांना त्याच्याविषयी लिखाण करायला सांगतात, तसेच बालसाधकाला आवडता खाऊ आणि भेटवस्तूही देतात. या कृतीतून ते त्या पूर्ण कुटुंबाला आणि नातेवाइकांनाही आपलेसे करतात.

४ आ. लिखाण सेवा करण्यास प्रोत्साहन म्हणून लेखावर ‘आवडले’ असे लिहून संबंधित साधकास आवर्जून खाऊ देणे : ते साधकांना लिखाण सेवा करायला पुष्कळ प्रोत्साहन देतात. साधकांनी स्वतःला आलेल्या अनुभूती आणि इतर लेखन करून दिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद होतो.  ते लेख आवडल्याचा निरोप पाठवून साधकाला खाऊ पाठवतात. अशा प्रकारे ते सर्वांना समष्टी साधना करण्यास उद्युक्त करतात आणि प्रयत्न केल्यास त्वरित कौतुकही करतात.

(क्रमश:)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२१)