श्रावण शुक्ल पक्ष एकादशी (१८.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रतीक्षा लोहार हिचा १९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिची आई सौ. रेखा लोहार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. प्रतीक्षा लोहार हिला १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
१. जन्म ते २ वर्षे
शांत आणि उत्साही : ‘प्रतीक्षा शांत आणि उत्साही होती. वर्ष २००६ मध्ये सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर आम्ही तिला सत्संगाला घेऊन जात होतो. सत्संग संपायला रात्री कितीही विलंब झाला, तरी ती त्रास न देता शांत बसायची.
२. वय ३ ते ६ वर्षे
२ अ. लहान बहिणीची प्रेमाने काळजी घेणे : प्रतीक्षा तिच्या लहान बहिणीला (कु. अस्मिता हिला) व्यवस्थित सांभाळायची. ती तिची पुष्कळ काळजी घ्यायची. ती तिला जे हवे, ते द्यायची आणि तिला समजून घेऊन तिच्याशी प्रेमाने वागायची.
२ आ. नामजप आणि सेवा करणे : तिला साधना समजल्यावर ती नामजपादी उपाय करू लागली. ती तिच्या वडिलांच्या समवेत ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांच्या वितरणाला जाणे, ग्रंथप्रदर्शनावर थांबणे’, अशा सेवा करत होती.
३. वय ७ ते १५ वर्षे
३ अ. लहानपणापासूनच तिचे रहाणीमान साधे आहे.
३ आ. देवतांची चित्रे काढणे : तिचे अक्षर सुंदर आहे. तिला चांगली चित्रे काढता येतात. ती लहानपणापासूनच श्रीकृष्ण आणि गणपति यांची चित्रे काढत होती.
३ इ. आईला घरकामात साहाय्य करणे : प्रतीक्षा ‘घराची स्वच्छता करणे, भांडी घासणे, देवपूजा करणे, स्वयंपाकात साहाय्य करणे, वडिलांना (श्री. दत्तात्रेय लोहार यांना) अंथरूण घालून देणे, लहान भावाला सांभाळणे, त्याची काळजी घेणे’, अशा सेवा करायची. ती घरी कामांमध्ये साहाय्य करत असल्यामुळे मी बाहेर जाऊन सेवा करू शकले.
३ ई. महाविद्यालयीन मुलांचे ऐहिक जीवन पाहून पुढे शिक्षण न घेण्याचे ठरवणे : ती लहानपणापासूनच बुद्धीमान होती. तिला परीक्षेत ८० टक्के गुण मिळायचे; पण माध्यमिक शाळेत असतांना महाविद्यालयीन मुलांचे ऐहिक जीवन पाहून तिने ‘पुढे शिक्षण घ्यायचे नाही’, असे ठरवले.
४. वय १६ ते १९ वर्षे
४ अ. वर्ष २०१८ मध्ये प्रतीक्षाने पूर्णवेळ साधनेला प्रारंभ केला.
४ आ. तिच्यामध्ये ‘नवीन गोष्टी शिकणे, पुढाकार घेऊन आणि झोकून देऊन सेवा करणे, इतरांचा विचार करणे; कितीही त्रास झाला, तरी सेवा परिपूर्ण करणे’, असे गुण आहेत.
४ इ. काही अडचण असल्यास किंवा एखादा प्रसंग घडल्यास ती वडिलांशी बोलून त्यांच्याकडून योग्य दृष्टीकोन घेते आणि त्याप्रमाणे प्रयत्न करते.
४ ई. प्रेमभाव : ती रामनाथी आश्रमात गेल्यावर घरच्यांना भ्रमणभाष करून त्यांची प्रेमाने विचारपूस करते.
४ उ. ‘तिची आवड-नावड आणि आसक्ती अल्प आहे’, असे मला वाटते.
‘हे गुरुदेवा, हे सर्व लिखाण तुम्हीच माझ्याकडून करवून घेतल्याविषयी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. रेखा लोहार (आई), खडकेवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. (३१.७.२०२१)