सौ. नीलिमा खजुर्गीकर या मागील १५ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्या झोकून देऊन सेवा करतात. ‘सर्वांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवता यावी’, या तीव्र तळमळीने त्या सेवारत रहातात. त्यांच्या सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्रीमती जयश्री जावळकोटी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.
१. प्रेमभाव
‘सौ. खजुर्गीकरकाकूंना सगळ्यांविषयी पुष्कळ प्रेम वाटते. त्या प्रत्येकाची प्रेमाने आणि नम्रतेने विचारपूस करतात.
२. जवळीक साधणे
अ. समाजातील जिज्ञासूंना भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर काकू जिज्ञासूंच्या घरातील सगळ्यांशीच बोलतात. त्यामुळे ते कुटुंब सनातनशी जोडले जाते. त्या कुटुंबियांनाही काकूंशी बोलल्यावर आनंद वाटतो आणि त्यांचा आधार वाटतो.
आ. अक्कलकोटमध्ये त्यांना ‘सनातन काकू’ या नावाने ओळखतात. वाचक आणि हितचिंतकही काकूंच्या येण्याची वाट पहात असतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
त्या व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि व्यष्टी साधनेचा आढावाही नियमित देतात. त्या प्रतिदिन त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगतात. चुका सांगतांना त्या त्यांच्या मनाची प्रक्रिया मनमोकळेपणे आणि प्रांजळपणे सांगतात.
४. काकू इतरांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगून त्यांना साहाय्य करतात.
५. चुकांविषयी खंत वाटून प्रायश्चित्त घेणे
घरी किंवा समष्टी सेवा करतांना त्यांच्याकडून चूक झाल्यास त्या लगेच प्रायश्चित्त घेतात आणि ते प्रायश्चित्त पूर्णही करतात. ‘मी अशा चुका करूनही प्रायश्चित्त घेतले नाही, तर गुरुदेवांना काय वाटेल ?’, या तळमळीने त्या प्रायश्चित्त घेतात.
६. शिकण्याची वृत्ती
त्या कन्नड भाषिक असल्याने पूर्वी त्यांना मराठी बोलता येत नव्हते; पण आता त्या मराठी बोलायला शिकल्या. आता त्या मराठीतून जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करतात.
७. सेवेची तळमळ
त्या सतत सेवारत रहाण्यासाठी प्रयत्न करतात. त्या प्रतिदिन समाजातील जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना साधना सांगतात. ‘सगळ्यांनीच सेवा आणि साधना करावी’, अशी त्यांची पुष्कळ तळमळ असते.
८. भाव
त्यांच्या मनात गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. गुरुदेवांचे नाव काढले, तरी त्यांचा भाव जागृत होतो. त्या वेळी त्यांना भावाश्रू येतात.
९. काकूंना आलेली अनुभूती
शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन आत्मनिवेदन करणे अन् त्यानंतर त्रास न्यून होणे : त्यांना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास आहे. त्यांना कितीही त्रास होत असला, तरी त्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन आत्मनिवेदन करतात. त्यामुळे त्यांचा त्रास न्यून होतो आणि त्या पुन्हा पूर्ववत् सेवा आणि साधना करू लागतात.’ (२०.७.२०२१)
कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
१. सेवेची तळमळ
‘अक्कलकोटमधील घराघरांत श्री गुरूंचे ज्ञान आणि चैतन्य पोचायला हवे अन् सगळ्यांना गुरुकृपा अनुभवता यावी’, अशी काकूंची तळमळ असते. त्यासाठी त्या अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न करतात.
२. भाव
अ. प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘मी गुरुदेवांशीच बोलत आहे’, असा त्यांचा भाव असतो.
आ. काकू व्यष्टी साधनेचा आढावा देतांनाही भावाच्या स्थितीत असतात. त्या ‘ऑनलाईन’ सत्संगात आढावा सांगत असतांना सत्संगाला जोडलेल्या सगळ्यांचा भाव जागृत होतो.
इ. काकूंकडे पाहिले, तरी माझा भाव जागृत होतो आणि माझे मन अंतर्मुख होते.’ (२०.७.२०२१)