१३ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. हे दैनिक हातात मिळेपर्यंत कदाचित ते काबूलमध्ये पोचतीलही. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल. अफगाणी सैन्य लढत असूनही त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. नुकताच तालिबान्यांनी येथील एका गर्व्हनरचा उंची प्रासाद कह्यात घेतला. तेथील नक्षीदार मोठ्या आसंद्या आणि भूमीवरील आच्छादानावर कसेही बसून ते खात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. ते पाहून या आतंकवाद्यांची वृत्ती कशी प्राणीसदृश आहे, याचा प्रत्यय आला.
तालिबानच्या वर्चस्वाचा इतिहास
वर्ष १९९४ मध्ये ‘विद्यार्थी’ (‘तालिब’चा अर्थ ‘इस्लामी कट्टरतावादावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’) या नावाने उभी राहिलेली केवळ ५० विद्यार्थ्यांची ही कट्टर इस्लामी संघटना अत्यंत अल्पावधीत वाढून विश्वातील सर्वांत जहाल आतंकवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. केवळ शरियतचे क्रूर कायदे मानणारा हा अफगाणिस्तानमधील एक पक्ष होता. तेथील लोकांनी आरंभी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर राज्य करायला आरंभ केला. पुढे त्यांनी अमेरिकेवर ९/११ चे आक्रमण करून जगापुढे इस्लामी आतंकवादाचे आव्हान उभे केले. दोन दशकांपूर्वी ज्या अमेरिकेने त्यांचे शस्त्रांचे कारखाने चालण्यासाठी अफगाणमध्ये शस्त्रे विकली, तीच घेऊन आतंकवाद्यांनी जगाला आव्हान दिले. या आतंकवादाचा निःपात करण्यासाठी रशिया, इंग्लंड आणि मुख्यत्वे अमेरिकेने गेली २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या फौजा पाठवून आतंकवाद न्यून केला. लादेनचा अंत केला. अफगाण स्थिरस्थावर झाला. या सर्व काळात अमेरिकेचा बराच पैसा येथील युद्ध आणि सैनिक यांवर व्यय झाला. अमेरिकेतील आर्थिक संकटात तेथील जनतेचा या खर्चाविषयी दबाव वाढू लागला. त्यानंतर आता अमेरिकेने तेथील सैन्य माघारी बोलवायला आरंभ केला. जेव्हा अमेरिकेने संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून काढून घेतले, तेव्हा पुन्हा एकदा तालिबानी आतंक्यांनी त्यांचे डोके वर काढले आणि ते अजूनही जागृत असल्याची चेतावणी दिली. त्यांनी अफगाणिस्तानातील प्रदेश बळकवायला आरंभ केला. ९० दिवसांत त्यांनी एकेक मुख्य शहर बळकावत, आता मोठा प्रदेश काबीज केला आहे. अर्थात् त्यांच्या विचारसरणीच्या सुन्नीपंथीय स्थानिकांविना त्यांना हे शक्य झालेले नाही. जे त्यांच्या विरोधातील अफगाणी शियापंथीय आहेत, त्यांना बेघर करून त्यांनी रस्त्यावर आणले आहे. त्यांची स्थिती आता अत्यंत दयनीय आहे. बायका, मुले आणि पुरुष किरकोळ सामानासह तंबू ठोकून निर्वासित जीवन जगत आहेत. या निर्वासितांची संख्या ३ लाखांच्या वर गेली आहे. तेथील मुलींना पळवून विकले जात असल्याचेही वृत्त आहे. अनेक शहरांतून बाँबवर्षाव केल्यामुळे अनेक अफगाणी घायाळ झाले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान
‘अफगाणिस्तानात सैन्य पाठवल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत’, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता शाहीन याने दिली आहे. यापूर्वी अफगाणिस्तानला साहाय्य म्हणून भारताने तिथे रस्ते बनवून दिले होते, ते या तालिबान्यांनी उखडले. भारताने अफगाणला दिलेले हेलिकॉप्टर पाडले. भारताचे अनेक प्रकल्प तिथे चालू आहेत. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचा भारतीय वंशाचा पत्रकार दानिश सिद्दीकी याने आमच्याशी समन्वय न ठेवल्याने त्याची हत्या झाली आहे’, असे तालिबान्यांनी तोंड वर करून सांगितले आहे. एका भारतीय प्राध्यापकाचे अपहरण केले आहे. भारताने ४ दुतावासांपैकी काबुल दुतावासातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अद्याप भारतात परत आणलेले नाही. ते जीव मुठीत धरून तिथे आहेत. ‘तालिबानी कोणत्याही दुतावासांना लक्ष्य करणार नाहीत’, असे त्यांनी घोषित केले असले, तरी त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ? तेथील दोहा येथील भागात भारताच्या प्रतिनिधी मंडळाने तालिबान्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. ‘तालिबानने अफगाणी भूमीवर भारताविरोधातील कारवाया करू नयेत’, अशी भारताची अपेक्षा आहे. अर्थात् तशीच जगातील सर्व देशांचीही अपेक्षा आहे. सध्या तालिबान्यांनी तसे न करण्याचे आश्वासन दिले असले, तरी शरीयत मानणारे त्यांची आसुरी वृत्ती दाखवल्याविना रहाणार नाहीत. त्यामुळेच ‘तालिबानी सरकार अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आले, तरी जगातील कोणताही देश त्यांना पाठिंबा देणार नाही’, असे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले आहे. अफगाणिस्तानमध्ये १ सहस्र ७०० भारतीय रात्रीच्या वेळी घातपात झालाच, तर पळून जाण्याची सिद्धता म्हणून सर्व साहित्याची बॅग समवेत घेऊन झोपत आहेत. २ दिवसांपूर्वी काहींना परत आणले असले, तरी अजून अनेक भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत.
तालिबानांच्या आक्रमणाचे परिणाम !
विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तान तालिबान्यांना पाठिंबा देत आहे. चीन आणि पाक सार्या जगाचे शत्रू बनले आहेत. तसेच आतंकवादीही सार्या जगाचे शत्रू आहेत. शत्रूचा शत्रू तो मित्र अशी त्यांची स्थिती आहे. अमेरिका, भारत यांसारख्या देशांना आव्हान देणे हा तालिबान्यांना पाठिंबा देण्यामागचा एक उद्देश आहे. हे त्यांच्या किती अंगाशी येणार आहे, याची त्यांना कल्पना नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अफगाण कह्यात घेऊन तालिबानी उद्या पाकच्या सीमेशी आल्यावर पाकमध्येही काय हाहाःकार उडेल, हे सांगता येत नाही. पाकमधील आतंकवाद्यांशी तालिबानचे घनिष्ठ संबंध आहेत; किंबहुना ते एकच आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने अन्य देशांना अफगाणी निर्वासितांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांत भयानक गोष्ट म्हणजे १ सहस्र २०० अफगाणी निर्वासित देहलीत आले आहेत. त्यांची संख्या वाढण्यास आणि त्यांच्यापासून भारताला धोका निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !