रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असणारे प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या ध्यानस्थ मारुतीच्या चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. गुरूंनी (प.प. श्रीधरस्वामी यांनी) मारुतीची उपासना करण्यासाठी मानससरोवर येथे जाण्यास सांगणे
‘माझे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांना मी सतत सांगत होतो की, मला मारुतीरायांना पहायचे आहे. त्यावर ते म्हणाले, ‘‘मारुतीरायांना बघणे वाटते तितके सोपे नाही. त्यांचे वास्तव्य मानससरोवर येथे आहे.’’ मी त्यांना ‘त्यासाठी मला काय करायला लागेल ?’, असे विचारले असता, त्यांनी ‘तुला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप ११ लक्ष वेळा करावा लागेल’, असे सांगितले.
२. मानससरोवर येथे पू. जाधव यांची भेट होणे आणि त्यांच्या समवेत राहून मारुतीची उपासना करणे
वर्ष १९६२ मध्ये म्हणजे वयाच्या २० व्या वर्षी गुरूंचा आशीर्वाद घेऊन मानससरोवर येथे गेलो. तेथे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक संत पू. जाधव यांच्याशी माझी ओळख झाली. जसे मी प.प. श्रीधरस्वामींच्या आज्ञेने आलो होतो, तसे ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आज्ञेने आले होते. ते संत गोंदवलेकर महाराजांचे भक्त होते आणि चित्रकार होते. मानससरोवर येथे भिल्ल जमातीचे लोक रहायचे. आम्ही दोघांनी तेथील भिल्ल लोकांना काही पैसे देऊन त्यांच्याकडून एक खोप (लहान झोपडी) बांधून घेतले. आम्ही दोघे तेथे राहून मारुतीची उपासना करू लागलो. ‘मला साहाय्य होण्यासाठी त्या संतांची आणि माझी भेट होणे, हे ईश्वराचेच नियोजन होते’, असे मला जाणवले.
३. गुरूंच्या आज्ञेनुसार ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप पूर्ण केल्यावर दैवी संकेत मिळू लागणे
जानेवारी १९६२ ते मार्च १९६३ या १४ मासांत मी रात्रंदिवस ध्यानाला बसून ११ लक्ष वेळा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप पूर्ण केला. एप्रिल मासात आम्हाला निराळी स्पंदने जाणवू लागली. आमच्या सभोवताली पांढरा प्रकाश दिसू लागला. काही दैवी संकेतही मिळू लागले. आम्ही रहात असलेल्या ठिकाणी आणखी कुणाचे तरी अस्तित्व आहे, असे जाणवू लागले.
४. ध्यान लागल्यावर समोर साक्षात् मारुतीरायाचे दर्शन होणे
एकदा पहाटे ४ वाजता आम्ही ध्यानाला बसलो होतो. आमचे ध्यान लागले. तेव्हा आम्हाला समोर साक्षात् मारुतीरायाचे दर्शन झाले. ३ मिनिटे आम्ही मारुतीरायाचे ते रूप पहात होतो. त्या वेळी माझ्या समवेत असणार्या संतांनी एक ते दोन मिनिटांत मारुतीरायाचे चित्र रेखाटले. तिसर्या मिनिटाला चैतन्य सहन न झाल्याने आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो. पहाटेच्या सुमारास काही साधू-संत तेथून स्नानाला जात होते. आम्ही बेशुद्ध पडलेले पाहून त्यांनी आमच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि आम्हाला शुद्ध आली. (मारुतीरायाचे ज्या रूपात दर्शन झाले त्या रूपातील चित्र प.पू. दास महाराजांच्या खोलीतील देवघरात पूजेत ठेवलेले आहे. – संकलक)
५. हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाच्या चित्राचे पूजन केल्यानंतर त्यात वैशिष्ट्यपूर्ण पालट होत असल्याचे जाणवणे
वर्ष २०२० मध्ये हनुमान जयंतीच्या २-३ मासांपूर्वी माझ्याकडील मारुतीरायाचे चित्र रामनाथी आश्रमात जतन करण्यासाठी दिले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी मला ते परत मिळाले. हनुमान जयंतीला मारुतीरायाचे पूजन केल्यापासून त्या चित्रात पुढील पालट जाणवू लागले आहेत. चित्रातील मारुतीच्या हाताचे अंगठे हालणे, मारुतीच्या डोळ्यांची हालचाल होत असणे इत्यादी. तसेच चित्रातील (काचेच्या आतील बाजूस) मारुतीरायाच्या एका पायावर दैवीकण दिसत आहे.’
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२०)
१. प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या ध्यानस्थ मारुतीच्या चित्राची पंचतत्त्वांच्या स्तरावरील आध्यात्मिक वैशिष्ट्ये
टीप – प.पू. दास महाराज यांच्याकडील मारुतीच्या मूळ (मोठ्या आकारातील) चित्राचे लहान आकारातील ‘प्रिंट’ काढलेले चित्र आहे.
२. प.पू. दास महाराज यांच्याकडे असलेल्या मारुतीच्या चित्राकडे पाहून भावजागृती होणे
हे चित्र हातात घेऊन पाहिले असता मनाला अधिक प्रमाणात आनंद जाणवून भावजागृती होते. मारुतीच्या अनाहतचक्रापाशी असलेल्या राम-सीता यांच्याकडे पाहून ध्यान लागते.
३. उपासकामध्ये देवतेप्रती उच्च कोटीचा भाव असल्यास त्या देवतेच्या चित्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट होणे
सर्वसाधारणपणे काल्पनिक पद्धतीने काढलेल्या चित्रामध्ये सात्त्विक स्पंदनांचे प्रमाण अल्प असते, तर चित्रकाराला देवतेने दर्शन देऊन तिचे चित्र काढून घेतले असल्यास त्यामध्ये सात्त्विक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. उपासकामध्ये देवतेप्रती उच्चकोटीचा भाव असल्यास त्या चित्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट होतात, तसेच त्या चित्रामध्ये सात्त्विक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विद्यालय, गोवा.(१६.७.२०२०)
नामजप करत असतांना प.पू. दास महाराज आणि ध्यानस्थ मारुतीचे चित्र यांच्या उपायांच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. प.पू. दास महाराज जपमाळ घेऊन नामजप करत असतांना मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवून सुषुम्ना नाडी कार्यरत होणे, त्यांनी जपमाळ ठेवून देऊन ध्यान लावल्यावर सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागणे आणि त्यानंतर गाढ ध्यान लागणे
‘१२.७.२०२० या दिवशी ‘प.पू. दास महाराज जपमाळ घेऊन नामजप करत असतांना आणि नंतर ते जपमाळ ठेवून देऊन ध्यानस्थ झालेले असतांना साधकांना काय जाणवते ?’, हा प्रयोग होता. या एकूण १ घंट्याच्या प्रयोगाच्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले.
अ. प.पू. दास महाराजांनी जपमाळ घेऊन नामजप करण्यास आरंभ केल्यावर मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तसेच तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
आ. मला प.पू. दास महाराजांकडे पाहून पुष्कळ आनंद वाटत होता. माझा नामजपही होत होता आणि मधे मधे माझे ध्यानही लागत होते.
इ. साधारण १५ ते २० मिनिटांनी त्यांनी जपमाळ ठेवून दिली आणि ते ध्यानस्थ झाले.
ई. प.पू. दास महाराज ध्यानस्थ झाल्यावर मला त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी स्पंदने माझ्या सहस्रारचक्रावर जाणवू लागली. ‘ती स्पंदने वातावरणावर परिणाम करत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझी सुषुम्ना नाडीच कार्यरत होती.
उ. त्यानंतर माझे ध्यान लागले. मला ‘प.पू. दास महाराजांचा प्रयोग कधी संपला आहे’, हे समजलेच नाही. प्रयोग संपल्यावर त्यांनीच मला जागे केले.
२. ‘ध्यानस्थ असलेल्या प.पू. दास महाराजांकडे बघणे’ आणि ‘चित्रातील ध्यानस्थ मारुतीकडे बघणे’, या दोन्ही प्रयोगांच्या वेळी लागलेल्या ध्यानातून बाहेर येतांना जाणवलेला भेद
प.पू. दास महाराजांकडे ध्यानस्थ असलेल्या मारुतीचे चित्र आहे. ‘त्याकडे बघून उपायांच्या संदर्भात काय अनुभूती येतात ?’, असा प्रयोग घेण्यात आला. तसेच प.पू. दास महाराज ध्यानस्थ बसल्यावरही तसाच प्रयोग घेण्यात आला. या दोन्ही प्रयोगांच्या वेळी माझे गाढ ध्यान लागले होते आणि प्रयोग संपल्याचे मला दोन्ही वेळी कळले नव्हते. त्यामुळे मला ध्यानातून उठवण्यात आले. मी ध्यानातून बाहेर येतांना मला दोन्ही वेळी वेगवेगळे जाणवले. ध्यानस्थ असलेल्या मारुतीमुळे मला लागलेल्या ध्यानावस्थेतून मी बाहेर आल्यावर मला ध्यानावस्थेत जसा हलकेपणा जाणवत होता, तसाच हलकेपणा ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावरही जाणवत होता. याउलट प.पू. दास महाराज ध्यानस्थ बसल्यावर मला लागलेल्या ध्यानावस्थेतून बाहेर येतांना मला माझ्या शरिराचे पुष्कळ जडत्व जाणवू लागले. ते मला नकोसे वाटू लागले. ‘या दोन्ही वेळी वेगवेगळे का जाणवले ?’, याचा विचार करतांना लक्षात आले, ‘चित्रातील मारुतीला देह नाही. त्यामुळे त्याच्या निर्गुण वायुतत्त्वामुळे माझ्यातील पृथ्वीतत्त्व अल्प झाले आणि मी जेव्हा ध्यानावस्थेतून बाहेर आलो, तेव्हा मला माझ्या देहाचे जडत्व जाणवले नाही. याउलट प.पू. दास महाराज हे देहधारी असल्याने, म्हणजे त्यांच्यातील पृथ्वी आणि आप तत्त्वांमुळे माझ्यातील पृथ्वीतत्त्व तेवढ्या प्रमाणात अल्प झाले नाही. त्यामुळे ध्यानावस्थेतून जागृतावस्थेत येत असतांना मला माझ्याच शरिराचे जडत्व जाणवून ते नकोसे झाले. त्यामुळे त्या वेळी मला ‘ध्यानावस्थेतून बाहेर येऊच नये’, असे वाटत होते.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.७.२०२०)
प.पू. दास महाराज यांच्याकडील मारुतीच्या चित्राचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी केलेला प्रयोग आणि त्याचे परिणाम
१. प.पू. दास महाराज यांच्याकडील मारुतीचे चित्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसमोर ठेवल्यावर ते आपोआप खाली पडणे
‘प्रयोगात प.पू. दास महाराज यांच्याकडील मारुतीचे चित्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसमोर ठेवल्यानंतर ते आपोआप खाली पडले. खाली पडल्यानंतरही चित्रातील मारुतीचा तोंडवळा वरील बाजूस होता. प.पू. दास महाराजांनी याचा पुढीलप्रमाणे अर्थ सांगितला – ‘ज्या वेळी मारुति उड्डाण करतो, त्या वेळी तो भूमीवर पायाने दाब देऊन उड्डाण करतो.’
२. दोन साधिकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून एकमेकांशी मारामारी करत असल्याचे जाणवले
प्रयोगाच्या आरंभी त्रास असणारे साधक शांत बसले होते. काही वेळाने दोन साधिकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून एकमेकांशी मारामारी करू लागल्याचे जाणवले.
थोडक्यात, मारुति स्थूल आणि सूक्ष्म युद्धासाठी शक्ती पुरवणारी देवता आहे. ‘प.पू. दास महाराज यांच्याकडील मारुतीच्या चित्रामध्ये किती आध्यात्मिक सामर्थ्य आहे’, हे या प्रयोगातून लक्षात येते.’
– कु. प्रियांका लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), महर्षि अध्यात्म विद्यालय, गोवा. (१६.७.२०२०)
|